Buldhana News: ड्रगमाफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून नुकतीच अटक करण्यात आली. यानंतर आता ससून रुग्णालयातून पळून जायला कोणी मदत केली, तसेच ड्रग्ज तस्करी प्रकरणात अजून कुणा-कुणाचा सहभाग आहे, याबाबतची कसून चोकशी पोलिस करणार आहेत. ललित पाटील प्रकरणावरून राज्यात सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच आता बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
"राज्यभरात ट्रकची तस्करी करणारा ड्रगमाफिया ललित पाटील हा अलीकडच्या काळात जन्माला आलेला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ललित पाटील मोठ्या प्रमाणावर ड्रग्स तस्करी करायचा. हे माहिती असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटीलच्या हातावर शिवबंधन बांधले", असा खळबळजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला.
'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काउंटर करण्याचा उद्धव ठाकरे यांचा कट होता', असा आरोप काही दिवसांपूर्वी करत आमदार संजय गायकवाड यांनी करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. आमदार गायकवाड यांचे हे आरोपाचे प्रकरण ताजे असतानाच त्यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंवर दुसरा गंभीर आरोप केला.
"संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना ललित पाटील काय करतो, हे चांगल्या पद्धतीने ठाऊक होते. ललित पाटील ड्रग्जच्या विश्वात काल-आज जन्माला आलेला व्यक्ती नाही. ड्रग्जच्या तस्करीचा ललित पाटील हा जुना आणि मुरलेला खेळाडू आहे. हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना चांगलेच माहिती होते, ही माहिती असतानाही संजय राऊत यांच्या उद्धवसाहेबांनी ललितच्या हातावर शिवबंधन का बांधले", असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
"संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या लोकांनी कोणावरही आरोप करताना वस्तुस्थिती काय आहे आणि आपण काय केले होते, याचे स्मरण ठेवावे", असेही गायकवाड म्हणाले.
"आपण रुग्णालयातून पळून गेलो नाही, तर आपल्याला पळवण्यात आले. योग्य वेळ आली की कोणी कसे पळायला लावले, कोणी मदत केली त्यांची नावे सांगू", असे ललितने म्हटले. "ललित पाटील याने त्याला मदत करणाऱ्यांची नावे घेण्यास सुरुवात केल्यास अनेकांची गोची होणार आहे. पोलिस यंत्रणेने त्याला शोधून काढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लागेलच, पण ज्यांनी ड्रगमाफियांच्या हाती शिवबंधन बांधताना मागेपुढे पाहिले नाही, त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना त्यातील तीन मोठे आपल्याकडे आहेत हे विसरता कामा नये", असा इशाराही आमदार गायकवाड यांनी दिला.
संजय राऊत आणि त्यांच्या 'आकांनी' कुठे कुठे काय काय पराक्रम केले आहेत, याची भली मोठी यादीच आहे. त्यामुळे जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करू नये", असा घणाघातही गायकवाडांनी केला.
दरम्यान, ठकारे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. भुसेंच्या मदतीनेच ललित पाटील ससून रुग्णालयात होता, असा आरोपच अंधारे यांनी केला होता, तर हे आरोप भुसे यांनी फेटाळून लावले होते.
आता आमदार गायकवाड यांनी केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Edited by Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.