

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु असतानाच मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मागील दोन निवडणुकामध्ये सत्ताधारी पक्षाला घाम फोडणारे अशोक जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी बाजूला ठेवून काँग्रेसचा पंजा जवळ केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ऐन निवडणुकीतच अशोक जगदाळे यांनी तुतारी ठेवून आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधील राजकीय चित्र 360 डिग्रीमध्ये बदलणार आहे. जगदाळे यांनी मंगळवारी मुंबईत काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी धाराशिव जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणचे चित्र पालटले आहे. भूम-परंडा मतदारसंघातील माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर व संजय निंबाळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडली आहे. त्यानंतर आता नळदुर्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकासह काँग्रेसचा हात धरल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. येत्या काळात तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील विरुद्ध अशोक जगदाळे अशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समोरासमोर येणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार व एक खासदार होता. मात्र, आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. या सर्व प्रकाराला येथील स्थानिक नेतृत्व कारणीभूत असल्याचा दावा पक्ष सोडताना या सर्वच नेतेमंडळींनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत अशोक जगदाळे?
अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 2018 साली त्यांनी उस्मानाबाद-बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था (विधानपरिषद ) निवडणूक ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने रिंगणातून माघार घेतल्यानंतर मोठया हिंमतीने लढली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात दंड थोपटला होता. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या जगदाळे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. अटातटीच्या या निवडणुकीत त्यांचा केवळ 32 मताने पराभव झाला होता. जवळच्या मंडळींनी दगाफटका केल्याने त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यानंतर त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक तुळजापूरमधून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यावेळेस त्यांना जवळपास 37 हजार मते पडली होती. त्यांच्यासोबत काँग्रेसचे विद्यमान आमदार मधूकरराव चव्हाण हे पण पराभूत झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांना 99 हजार 034 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे मधुकरराव चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकाची 77 हजार इतकी मते मिळाली. विजयाचे अंतर हे जवळपास 23 हजार169 इतके होते. तर वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना या निवडणुकीत जवळपास 37 हजार मते मिळाली होती. त्यासोबतच त्यांनी तुळजापूर तालुक्यात विविध सामाजिक कार्य केली आहेत.
नळदुर्गमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला खिंडार
अशोक जगदाळे यांच्यासोबत नळदुर्ग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक अमृत पुदाले, माजी नगरसेवक शरीफ शेख, नवल जाधव, माजी नगरसेविका सुमन जाधव, विकास सोसायटी चेअरमन संजय बेडगे, व्हाइस चेअरमन ताजोद्दीन सय्यद, रुकनोद्दीन शेख, नवल जाधव, अमोल सुरवसे, ताजोद्दीन सावकार, अलीम शेख, दत्ता राठोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडले आहे. नगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत जगदाळे यांची नळदुर्ग नगरपालिकेवर सत्ता होती. त्यांनी नगराध्यक्षासह 12 नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने शरद पवार यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.