छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दोन मंत्रीपदं मिळाली आहेत. शिवसेनेने संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना तर भाजपने अतुल सावे यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. दोन्ही मंत्र्यांना चांगली खाती आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या असल्या तरी दोघांचे लक्ष पालकमंत्री पदावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात संभाजीनगरचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होते.
दोन वर्ष संदीपान भुमरे हे पालकमंत्री होते, पण ते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर शेवटच्या तीन महिन्यात अब्दुल सत्तार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे पार जागा जिंकत बहुमताने सत्ता आणली. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. एकट्या (BJP) भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे सहाजिकच सरकारवर त्यांचे वर्चस्व आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि झालेल्या खाते वाटपातून ते स्पष्टही झाले आहे.
आता पालकमंत्री पदावरून पुन्हा महायुतीत तानातानी होऊ शकते याची झलक छत्रपती संभाजीनगरमध्ये पहायला मिळाली. मंत्री झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी मीच पालकमंत्री होणार, असे स्पष्ट केले. नैसर्गीकरित्या गेल्या सरकारमध्ये शिवसेनेचा पालकमंत्री असल्यामुळे शिरसाट यांचा दावा प्रबळ मानला जातो.
परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सरकार आणि मंत्रीमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. ते पाहता पालकमंत्र्यांची नेमणूक करतांनाही ते होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे आज शहरात भव्य मिरवणूकीने स्वागत करण्यात आले. माध्यमांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी दावा केला, त्याकडे त्यांचे लक्ष वेधले.
यावर आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे म्हणत चेंडू वरच्या कोर्टात ढकलला. मीच पालकमंत्री होणार, असे म्हणण्याचा उतावीळपणा सावे यांनी दाखवला नाही. संदीपान भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर आता पालकमंत्रीपद कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा भाजपने उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सावे यांना पालकमंत्री करावे, अशी मागणी केली होती.
परंतु तेव्हा महायुतीत वाद नको, म्हणून फडणवीसांनी ही मागणी फेटाळून लावली होती. तर तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवले होते. आता पुन्हा पालकमंत्री पदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.