Chhatrapati Sambahjinagar : नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मर्सिडीज कार प्रकरण चांगलेच गाजले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत असताना दोन मर्सिडीज कार मिळाल्या की एक पद मिळते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर करत खळबळ उडवून दिली होती. नंतर हे प्रकरण गोऱ्हे यांच्या चांगलेच अंगलट आले. मात्र या मर्सिडीज प्रकरणाची चर्चा काही केल्या थांबत नव्हती.
पून्हा ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे (Shivsena UBT) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख यांनी खरेदी केलेली मर्सिडीज कार. विशेष म्हणजे त्यांनी या नव्या अलिशान कारचे पूजन शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या हस्ते केले. यातून त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर विधान भवनाच्या लॉबीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांची उद्धव ठाकरे यांच्याशी समोरासमोर भेट झाली. तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढताना 'मर्सिडीज'चे भाव वाढवले नाहीत का? असा टोला लगावला होता. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही 'आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे काही सवलत मिळेल काय'असे म्हणत फडणवीस यांना चिमटा काढला होता.
परंतु हजरजबाबी असलेल्या फडणवीसांनी ही सवलत फक्त गरजूंना आहे, असे म्हणत दानवेंवर पलटवार केला होता. हे सगळं नव्याने सांगण्याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी नुकतीच खरेदी केलेली मर्सिडीज कार. मर्सिडीज कार वरून झालेल्या आरोपामुळे पक्षात मोठे वादळ काही दिवसांपूर्वी उठलेले असतानाच वैद्य यांच्या मर्सिडीज खरेदीनंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे वैद्य यांच्या या मर्सिडीज कारचे पूजन शिवसेनेचे दोन्ही नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे व शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसे पाहिले तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडे मर्सिडीज कार आहेत. आतापर्यंत मात्र त्याची कधीही चर्चा झाली नव्हती. पण शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर याच मर्सिडीज वरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेत दोन मर्सिडीज मिळाल्या की एक पद मिळते, असा आरोप त्यांनी केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत त्यांचे सगळ्या गोष्टींकडे लक्ष असायचे, मात्र त्यांच्यानंतर पक्षाची दुरावस्था झाली, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
गोऱ्हे यांच्या या आरोपा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती. असे विधान करण्याची आवश्यकता नव्हती, असे म्हणत या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महानगरप्रमुखांनी मर्सिडीज खरेदी करत त्याचा गाजावाजा केला. तसेच नेत्यांना बोलावून या नव्या आलिशान गाडीचे पूजनही केले.
यातून राजू वैद्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि नीलम गोऱ्हे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे नेते मर्सिडीज घेत नाहीत तर पदाधिकाऱ्याने स्वतःच्या मेहनतीने खरेदी केलेल्या मर्सिडीजचे पूजन करतात, असा संदेश यातून देण्याचा राजू वैद्य आणि छत्रपती संभाजीनगरच्या उद्धवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.