

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांचा नुकताच छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याचा दौरा झाला. संघटनात्मक बांधणीसाठीचा हा दौरा अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक नेत्यांवर पदाधिकारी, शिवसैनिकांकडून आरोपांमुळेच हा दौरा अधिक गाजला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मला पाडण्यासाठी ताकद लावली, रसदही पुरवली असा थेट आरोप जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी थेट केला होता.
शिवसेनेतील (Shivsena)अंतर्गत कलह ताजा असतानाच सोमवारी महापालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरून पुन्हा पक्षात नाराजीचा भडका उडाला. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव स्वीकृत सदस्य पदावर उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थक शुभम काळे यांची निवड जाहीर झाली. ही निवड जाहीर होताच पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक व स्वीकृतसाठी इच्छुक असलेले विनोद बनकर आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले.
उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत क्रांतीचौकात चक्क जंजाळ यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. जंजाळ हे मनुवादी व जातीयवादी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जंजाळ यांचे फोटो पायदळी तुडवले. 'जातीयवादी राजेंद्र जंजाळचं करायचं काय? मनुवादी राजेंद्र जंजाळ मुर्दाबाद,' अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. शिवसेनेकडून स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक जण इच्छुक होते.
संख्याबळानूसार पक्षाच्या वाट्याला एकच जागा येणार असल्याने पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. यासाठी पालकमंत्री, जिल्हाप्रमुख, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लाॅबिंग सुरू होते. परंतु, यात बाजी मारली ती शुभम काळे यांनी. काळे हे राजेंद्र जंजाळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
शिवसेनेत वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी असताना त्यांना डावलून जंजाळ यांनी जातीयवाद करत शुभम काळे यांना स्वीकृत सदस्य पदावर संधी दिल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde) यांच्या दौऱ्यानंतर पक्षातील कुरबुरी काहीशा थांबतील, अशी अपेक्षा होती. परंतु स्वीकृत सदस्य पदावरून पुन्हा शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन झाल्याने शिवसेनेत पुन्हा एकदा शिरसाटविरुद्ध जंजाळ हा वाद उफाळून आला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, उपमहापौर पदाच्या निवडीपासून शिरसाट-जंजाळ यांच्यातून विस्तवही जात नाही. श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच राजेंद्र जंजाळ यांनी आपल्याला व प्रभागातील पक्षाच्याच उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून झाल्याचा जाहीर आरोप केला होता. यावर शिरसाट यांनी खोटं बोल पण रेटून बोलं, असे म्हणत मुंबईहून समिती पाठवून चौकशी करा, असे आव्हान आरोपांवर दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.