Paranda Bazar Samiti : महाविकास आघाडीच्या संचालकांना मारहाण करून अपहरण केल्यामुळे राज्यात गाजलेल्या परंडा बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक आज मोठ्या तणावपूर्ण वातावरणात पार पडली. परंडा बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (उद्धव बाळसाहेब ठाकरे) जयकुमार जैन यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली. (Shiv Sena's Jayakumar Jain unopposed Elected for Paranda Bazar Samiti Chairmanship)
सभापती आणि उपसभापतीच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. २६ मे) बोलवण्यात आलेल्या विशेष सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व तेरा संचालक उपस्थित होते, तर महायुतीचे (शिवसेना शिंदे गट, भाजप-रिपाइं) पाच संचालक गैरहजर राहिले. मराठवाड्यातील महत्वाच्या आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मतदारसंघातील परंडा बाजार समितीवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राहुल मोटे यांच्या साथीने भगवा फडकवला आहे.
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत महाविकास आघाडीने अठरापैकी तेरा जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते, तर महायुतीला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीसाठी बुधवारी (ता. २४ मे) विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र, सहलीवर गेलेल्या महाविकास आघाडीच्या आठ संचालकांना टेंभुर्णीजवळ (जि. सोलापूर) मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. थोड्या अंतरावर नेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. सभेला एकही संचालक उपस्थित न राहिल्याने सभा तहकुब करून आज (ता. २६) पुन्हा बोलावण्यात आली होती.
या सभेला महाविकास आघाडीचे दादा घोगरे, डॉ. रविंद्र जगताप, शंकर जाधव, जयकुमार जैन, हरी नलवडे, संजय पवार, सोमनाथ सिरसट, रतनबाई देशमुख, सविता मिस्कीन, सुरेश शिंदे व अॅड सुजित देवकते, अनिकेत काशीद व जावेद बागवान हे संचालक उपस्थित होते. सभापतीपदासाठी जयकुमार जैन यांचा, तर उपसभापती पदासाठी संजय पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महायुतीचे राहुल डोके, अरविंद रगडे, विजयकुमार बनसोडे, महादेव बारसकर व परमेश्वर मिठाळे हे पाच संचालक गैरहजर होते.
समितीच्या आवारात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहूल मोटे तळ ठोकून होते. आवारात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. बिनविरोध निवड होताच समर्थकांनी फटाके वाजवून गुलाल उधळीत जल्लोष केला. गेल्या दोन दिवसांपासून ढवळून निघालेले राजकारण बिनविरोध निवडीमुळे निवळले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून तणाव असल्याने वातावरण बिघडू नये; म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे पोलीस निरिक्षक आमोद भुजबळ परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.