Marathwada News : मागील २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला जेरीस आणण्याऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता (Shivsena) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत युतीची अधिकृत घोषणा केली. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितने २३६ जागांवर उमेदवार देत ४.५८ टक्के मते मिळविली होती. तर शिवसेना-भाजप युती असतांना शिवसेनेला १६.४१ टक्के मते मिळाली होती.
राज्यातील राजकीय स्थिती पूर्णपणे बदलेली असली तरी ही आकडेवारी बघता दोन्ही पक्षांसाठी ही युती फायद्याची ठरणार आहे. (Maharashtra) आता शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातील इतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचयात समिती, नगरपालिका निवडणुकीत वंचित, (Vanchit Bahujan Aghadi) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत राहण्याची शक्यता आहे.
या दोन्ही पक्षासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २३६ जागांवर उमेदवार दिले होते, त्यांना तब्बल २५ लाख २३ हजार ५८३ मते मिळाली होती. त्याची टक्केवारी ४.५८ टक्के इतकी होती. सन २०२९ मध्ये शिवसेना-भाजप युती असल्याने शिवसेनेने १२६ जागांवर उमेदवार दिले होते त्यात त्यांना ५६ जागा मिळाल्या.
शिवसेनेच्या मतांची टक्केवारी १६.४१ टक्के इतकी होती. यात शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात ५, विदर्भ ४, मराठवाडा १२, ठाणे आणि कोकण १५, मुंबई १४, उत्तर महाराष्ट्रात ६ अशा एकूण ५६ जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतील वंचित आणि शिवसेनेची मतांचा बेरीज केली तर दोघांच्या मतांची टक्केवारी २१ टक्के होते. मात्र आता शिवसेनेतील ४० आमदारांनी फुटुन भाजप सोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेच्या मतांना सुद्धा खिंडार पडले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर वंचित आणि एमआयएमची युती होती. या युतीमध्ये एकट्या वंचितने ४७ जागा लढविल्या होत्या. यातील वंचितच्या ४७ उमेदवारांना ६.९२ टक्के मते मिळाली होती. तर एमआयएमला औरंगाबाद लोकसभेची एकमेव जागा लढत विजय मिळवला होता. या दोघांची एकत्रित मते ७.६५ टक्के होती. तर शिवसेनेने भाजपसोबत युती करत २३ जागा लढविल्या होत्या. त्यातील १८ जागा जिंकल्यामुळे त्यांच्या वाट्याला २३.५ टक्के मते आली होती.
वंचितने घेतली होती लाखोंनी मतं..
शिवसेनेत फुट पडलेली असली तरी या दोन्ही पक्षांच्या मतांची आकडेवारी दोन्ही पक्षांना दिलासा देणारी आहे. वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपली शक्ती दाखविली होती. यात मराठवाड्यात त्यांच्या सर्व उमेदवारांनी लक्षणीय तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती.
यात हिंगोलीत मोहन राठोड यांना १ लाख ७४ हजार ५, नांदेड मध्ये यशपाल भिंगे यांना १ लाख ६६ हजार १९६, परभणी आलमगिर खान यांना १ लाख ४९ हजार ९४६, जालन्यात शरदचंद्र वानखेडे ७७ हजार १५८, बीड विष्णु जाधव यांना ९२ हजार १३९, उस्मानाबादेत अर्जुन सलगर यांना ९८ हजार ५७९ तर लातूर येथे राम गरकर यांना १ लाख १२ हजार २५५ मते मिळाली होती.
शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना जोरदार झटका बसला आहे. आमदार सोडुन गेले तरी शिवसेनेसोबत मतदार आहे का याचे उत्तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतून मिळणार आहे. आता शिवसेनेला वंचितची साथ मिळाल्याने त्याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कस लागेल. विशेषतः मुंबई महापालिकेत या दोघांची खरी परिक्षा राहिल.
कारण मुंबईत दलित मते लक्षणीय आहे. त्यातच वंचितची स्थापना झाल्यापासून बसपासह इतर दलित पक्षांची मतेघटली आहे. त्यामुळे शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित या दोन्ही पक्षांनी जर लक्षणीय यश मिळविले तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ही युती पुढे जाऊ शकते. शिवसेना, वंचित बहुजन आघाडीची युती झालेली असली तरी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची भूमिका यात महत्वाची आहे. ते महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेतात का? हे राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.