
Beed News : सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणात रोज धक्कादायक दावे केले जात आहे. या हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा आरोपही केला जात आहे. याचदरम्यान,बीडमधील गुन्हेगारीचा काळा चेहराही पुढे आणला जात आहे. देशमुख यांच्या हत्येनं जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच आता बीडमधून (Beed) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गृहखात्यावरच जोरदार हल्ले चढवले जात आहे. गुन्हेगारांकडून थेट खाकीवर्दीलाच आव्हान दिले जात असून खंडणी,अपहरण, खून,बलात्कार,छेडछाड,विनयभंग,मारहाण,प्राणघातक हल्ल्याच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे पोलिस चौकीसमोरच तरुणावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस चौकीच्या समोरच ही घटना घडल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाच नसल्याचे दिसून येत आहे.
दारु पिण्यास नकार दिल्यानं जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख या तरुणावर धारदार शस्त्रांसह प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
या हल्ल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी श्रीहरी मुंडेसह, आर्यन मांदळे आणि इतर दोन जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमीर याच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
आरोपी श्रीहरी मुंडे याच्याकडून जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेखला दारू पिण्यासाठी आग्रह सुरू होता. पण जमीरने मुंडेच्या आग्रह नाकारत त्याला शिवीगाळ केली. याचाच राग मनात धरुन मुंडेने त्याला गुरूवारी रात्री जमीरला पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावले.तेथे जमीर आल्यावर श्रीहरीने त्याला शिवीगाळ का केली असा जाब विचारला.
त्यानंतर काही कळण्याच्या आतच आरोपी श्रीहरी मुंडेंसह आर्यन मांदळे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन जणांनी जमीरवर चाकू आणि कोयत्याने एकापाठोपाठ सपासप वार केले. या हल्ल्यात जमीर हा गंभीर जखमी झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 10 महिन्यांत 36 खुनाच्या घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. तसेच 168 खुनाचा प्रयत्न,386 विनयभंग,156 अत्याचाराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. याचबरोबर मारहाण,हिंसाचाराचे 498 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परभणीत 32 आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शास्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने?1222 अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील ? याचवेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीसांना आवाहन केले आहे की, महाराष्ट्रातल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा.जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा अशी मागणीही दमानिया यांनी ट्विटद्वारे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.