
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण तापलं असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामाही पडला.पण या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. वाल्मिक कराडनंतर (Walmik Karad) आता या प्रकरणात आणखी एका कराडचं नाव पुढं आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीनं आता वेग पकडला आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानं त्यांनी या केसवरची पकड मजबूत करतानाच अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. यातच आता देशमुख यांच्या हत्येतीतील आरोपींनी थेट सुग्रीव कराडचं नाव घेतल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत बीड न्यायालयात पहिली सुनावणी झाली. त्यानंतर,आरोपींच्या कबुली जबाबात मोठी धक्कादायक अपडेट समोर आली आहे. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुग्रीव कराडचं नाव घेतले.
आरोपींनी कबुली जबाबात सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि गावातील लोकांनी खंडणी मागायला गेलेल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली होती. त्यामुळे झालेली बदनामी आणि खंडणीप्रकरणी आड येत असल्यानंच देशमुख यांची हत्या करण्यात आली,असं जयराम चाटे यानं जबाबात म्हटल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 8 आरोपींची या अगोदरच या खटल्यात चौकशी करण्यात आली असून कृष्णा अंधारे हा फरार आहे. पण केज तालुक्यातील अवादा कंपनीकडे खंडणी मागायला गेलेल्या सुदर्शन घुले याला मारण्याची सूचना सुग्रीव कराडनं दिल्याचं जयराम चाटे यानं जबाबात सांगितलं आहे.
वाल्मिक अण्णा कराड आणि त्याच्या गँगची मारहाणीमुळे बीडमध्ये बदनामी झाली. त्यामुळे सुदर्शन भैय्याला वाल्मिक अण्णांनी या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितले.हा बदला घेण्यासाठी आपण सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्यांना चांगली अद्दल घडवायची,असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेच्या जबाबात आहे.यामुळे सुग्रीव कराड कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा आरोपींनी होता.याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे चाटे आणि केदार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे,याप्रकरणात नाव आलेला सुग्रीव कराड वाल्मिक कराडचा कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.पण सुग्रीव कराड हा दोन कोटींची खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा रक्ताचा नातेवाईक नसल्याचंही माहिती समोर येत आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता म्हणून सुग्रीव कराडची ओळख आहे.तो मूळचा केज तालुक्यातील तांबवा गावचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय राहिलेला आहे. त्याची आई पंचायत समिती सदस्या तर पत्नी केजच्या नगरसेविका आहेत.सुग्रीव कराड यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे.त्यांच्यावर अनेक ठिकाणी मारहाण,खून,दरोडा,अत्याचार, दंगल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत कराडची भूमिका संशयास्पद राहिल्यानंतर त्याला धनंजय मुंडेंनी दूर सारलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर सुग्रीव कराडनं थेट बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करणं सुरू केले. पूर्वी सुग्रीव कराड आणि बजरंग सोनवणे दोघेही मुंडेंचेच कार्यकर्ते म्हणून काम केल्याचंही दिसून आलं होतं.
महत्त्वाची बाब म्हणजे 2022 साली केज नगरपंचायत निवडणुकीत सुग्रीव कराड यांनी बजरंग सोनवणे यांची मुलगी डॉक्टर हर्षदा हिच्या विरोधात नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला होता.या लढतीत कराडनं सोनवणे यांच्या मुलीचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता.यावेळी विष्णू चाटे यांनीच सुग्रीव कराडला रसद पुरवल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला होता.मात्र,कालांतराने खासदार सोनावणे यांनी सुग्रीव कराड याला विष्णू चाटे याच्याविरुद्ध बळ दिलं होतं.
केज तालुक्यात संत भगवान बाबा जयंती उत्सवासाठी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. त्याठिकाणी विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्यात जयंतीच्या नेतृत्वावरून वादाची ठिणगी पडली होती. त्यात सुदर्शन घुले विष्णू चाटेच्या बाजू घेत थेट सुग्रीव कराडच्या अंगावर धावून जाण्याची घटना घडली होती.तेव्हापासून कराडच्या मनात बदल्याची भावना धुनसत होती.
केज तालुक्यामध्ये सुग्रीव कराडची मोठी दहशत वाढत होती.पण जयंती उत्सवाच्या निमित्ताने बोलावण्यात आलेल्या बैठकीत विष्णू चाटेला सुदर्शन घुलेसारखा कट्टर समर्थक मिळाल्याचं दिसून येत आहे. हाच वाद सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले याच्यामधल्या तीव्र संघर्षाचं मूळ कारण ठरली होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.