Solapur, 11 May : सोलापूर लोकसभेसाठी 2019 च्या तुलनेत एक लाख 20 हजार मतदान अधिक झाले असून टक्केवारीही पाऊण टक्क्याने वाढली आहे. त्यामुळे वाढलेली ही मते कोणाकडे झुकणार, यावरच सोलापूरच्या खासदारकीचे गणित सुटणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात मतदान वाढले आहे. सर्वाधिक 36,034 मते सोलापूर दक्षिण मतदारसंघात वाढली असून तेथील लिंगायत समाजाचा टक्का आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रभाव या मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहर उत्तर आणि अक्कलकोट हे हक्काचे तर मित्रपक्षाच्या रूपाने मोहोळ मतदारसंघ किती ताकद देतो, यावरच आमदार राम सातपुते यांच्या खासदारकीची स्वप्नपूर्ती अवलंबून आहे. इतर मतदारसंघात हाताचा बोलबाला झाल्याची चर्चा आहे.
सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Loksabha) बारा लाख एक हजार 586 मतदान झाले आहे. त्यात सर्वाधिक अक्कलकोट मतदारसंघात दोन लाख बारा हजार 790 मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अठरा हजार मतदान जादा झाले आहे. याच मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते (Ram Satpute) यांना मोठ्या मताधिक्क्याची अपेक्षा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे या मतदारसंघात भाजप लीड घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनीही आपली ताकद प्रणिती शिंदेंच्या (Praniti Shinde) पाठीशी उभी केलेली आहे. पण, अक्कलकोटमध्ये कमळ लीड घेण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाणीप्रश्न भाजपसाठी अडचणीचा ठरणार
अक्कलकोटपाठोपाठ दोन लाख अकरा हजार 251 मतदान हे पंढरपूर मतदारसंघात झाले आहे. हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंगळवेढा तालुक्यातील उपस्थित झालेल्या पाणी प्रश्नामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली होती. तोच मुद्दा आमदार प्रणिती शिंदे यांनी लावून धरला होता. तसेच, मराठा आरक्षणाचा मुद्दाही तेवढाचा तापलेला होता, त्यामुळे पंढरपूरमध्ये सर्वाधिक मतदान झाले असले आणि सत्ताधारी आजी-माजी आमदारांचा हा मतदारसंघ असला तरी या ठिकाणी हात वरचढ ठरण्याची शक्यता आहे. मोदी लाट असूनही गेल्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते.
सिद्धेश्वरची चिमणी, लिंगायत मतदार प्रभावी ठरणार
सोलापूर दक्षिण या मतदारसंघातही दोन लाखांपेक्षा (दोन लाख सात हजार 486 मतदान) अधिक मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख आमदार आहेत. लिंगायत समाजाचे प्रमाण दक्षिण सोलापूर मतदारसंघात अधिक आहे. त्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचा सर्वाधिक प्रभाव याच मतदारसंघात जाणवण्याची शक्यता आहे. सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी हे या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने उतरले होते. शेवटच्या दिवशी त्यांनी प्रणिती शिंदेंसाठी सभाही घेतली. पण, काडादी यांनी भाजपसाठी कधी सभा घेतली, असा युक्तिवाद भाजप समर्थक करतात. याशिवाय सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने हेही या वेळी शिंदेंच्या बाजूने होते. त्यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसला आशा आहेत.
शहर उत्तरमध्ये भाजपला गत यशाची अपेक्षा
आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या सोलापूर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघात सारखेच मतदान झाले आहे. या दोन्ही मतदारसंघात एक लाख 84 हजार इतके मतदान झाले आहे. पण 2019 च्या निवडणुकीपेक्षा शहर उत्तरमध्ये वीस हजार 102, तर सोलापूर मध्य मतदारसंघात 23 हजार 372 मते अधिकची पडली आहेत. सोलापूर शहर उत्तर हा माजी पालकमंत्री आणि चार वेळा आमदारकीला निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने 2019 मध्ये भाजपला 63 हजार 667 इतके लीड दिले होते. यावेळीही त्याच यशाची पुनरावृत्ती भाजपला अपेक्षित आहे. देशमुख यांनी आमदार सातपुते यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष किती मतदान भाजपला होते, हे पाहावे लागेल.
कोठेंनी संधी गमावली
खरं तर या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी महापौर महेश कोठे यांच्यासाठी ताकद दाखवण्याची संधी होती. मात्र, त्यांनी लोकसभेसाठी तेवढी ताकद लावल्याचे दिसून आले नाही. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचा पुतण्या माजी नगरसेवक देवेंद्र कोठे भाजपच्या गटात डेरेदाखल झाले. कदाचित विधानसभेसाठी कोठे यांची आपली ताकद राखून ठेवलेली असू शकते.
मुस्लिम मतांचा शिंदेंना आधार
सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे प्रणिती शिंदे यांची सारी भिस्त शहर मध्य या विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक आहे. मुस्लीम मतदार या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचे जाणवले. ते पारंपारिकपणे काँग्रेसला मतदान करतात, त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे.
राजन पाटील शब्द खरा करणार?
अगदी 2014 च्या मोदी लाटेतही काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना लीड देणारा मोहोळ मतदारसंघ या वेळी भाजपच्या बाजूने होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वाधिक लीड देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रश्नही तेवढाच मोठ्या प्रमाणात होता. त्याचा प्रत्यय भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना आला होता. मोहोळ शहर आणि या मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावांतून प्रणिती शिंदे यांना लीड मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती जोर लावला जातो, यावरच दोन्ही उमेदवारांचे लीड अवलंंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.