
Dharashiv News : शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं काय सुरुय याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महायुती सरकारच्या दुसर्या टर्ममध्ये सावंतांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांनी मतदारसंघाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. तसेच शिवसेनेच्या कार्यक्रमातही त्यांची दांडी चर्चेचा विषय ठरत असतानाच धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे.
धाराशिवमध्ये शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीअगोदर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. धाराशिव जिल्ह्यातलंं शिवसेनेचं मोठं प्रस्थ असलेल्या माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना थेट शिवसेनेच्या कार्यक्रमातून डावलल्यानं पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटला आहे.
धाराशिव शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुखाने लावलेल्या बॅनरवर आमदार तानाजी सावंत यांचाच फोटो गायब झाला आहे. या बॅनरवर तानाजी सावंत यांना पुन्हा डावलण्यात आलं आहे. यामुळे सावंत समर्थकांनी शिवसेनेच्या समन्वय बैठकीत गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या नेतृत्वातील धाराशिव येथे सोमवारी (ता.28) समन्वय बैठक पार पडत आहे. याच बैठकीअगोदर तानाजी सावंत यांच्या कट्टर समर्थकांनी राडा घातला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी लावलेल्या बॅनरवरुन तानाजी सावंत यांना डावललं. त्यानंतर सावंत समर्थक चांगलेच संतापले.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेते तानाजी सावंत यांना सातत्यानं डावलण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. याचमुळे सावंत समर्थकांनी राजन साळवी यांच्यासमोरच धुडगुस घातला. या गोंधळानंतर तानाजी सावंत समर्थक आणि राजन साळवी यांची बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना नेते तानाजी सावंत अवघ्या 1500 मताने निवडून आले. यानंतर सावंत यांना मंत्रिमंडळातूनही डावलण्यात आलं. यामुळे सावंत प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या प्रमुख कार्यक्रमांसह पावसाळी अधिवेशनाकडेही फिरवली होती. भूम- परंडा मतदारसंघात सध्या बोंबाबोंब सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक होऊन आठ ते नऊ महिने उलटून गेले आहेत, परंतु, निवडून आल्यापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मतदारसंघासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर पुण्यातच राहावा, असा खोचक सल्लाही मतदारसंघातल्या लोकांकडून दिला जात आहे. एकीकडे तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात न येण्यामुळे रोष असला तरी गेल्या दीड दोन महिन्यापासून सावंत हे आजारी असल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.