
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महत्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. येत्या काही दिवसात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. दिलीपकुमार सानंदा हे 1999, 2004 आणि 2009 असे सलग 3 वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
यंदाची विधानसभा निवडणूकही त्यांनी काँग्रेसकडून लढवली. पण त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. या पराभवानंतर सानंदा काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. काही दिवसांपुर्वी सानंदा यांच्या अधिपत्त्याखालील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 संचालकांनी सानंदा यांच्याच उपस्थित मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते देखील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.
अशात येत्या 26 एप्रिल रोजी काँग्रेसच्या वतीने सद्भावना सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसंदर्भात एका हॉटेलमध्ये नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धिरज लिंगाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. अनुपस्थिति आता त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारी ठरत आहे.
या बैठकीत उपस्थित नेत्यांनी आपले विचार मांडले. यावळी राहुल बोंद्रे यांनी सद्भावन सभेसंदर्भात काही सुचना मांडून पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांबाबत बोलताना कुणाचेही नाव न घेता काँग्रेस हा पक्ष खूप मोठा आहे, कार्यकर्ते हे कुणाच्याही दावणीला बांधलेले नसून कार्यकर्त्यांमुळे नेता मोठा होतो, त्यामुळे कोणी कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये तसेच कुणी पक्ष सोडून गेल्याने पक्ष संपत नसतो, ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे ते गेल्यामुळे नवीन लोकांना संधी मिळेल व काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.