Ambadas Danve: तुम्ही असताना 'शब्दाला' किंमत होती; विश्वासाची संस्कृती नव्या भाजपनं मोडीत काढली! अंबादास दानवेंचं गोपिनाथ मुंडेंना अनाहूत पत्र

Ambadas Danve: राज्यात दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.
Ambadas Danve
Ambadas Danve
Published on
Updated on

Ambadas Danve News : राज्यात दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडून भाजपाने शिवसेना फोडली. आता सत्तेत सोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेलाही संपवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप केले जात आहेत. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असाही सूर निघू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी आठवण काढली.

Ambadas Danve
Cockroch Party: दिल्लीत कॉकरोच पार्टीची एंट्री! कन्टेट क्रिएटर, पत्रकार, IIT च्या विद्यार्थ्यानं घेतली पत्रकार परिषद; ६ जूनच्या आंदोलनाचा सांगितला अजेंडा

गोपीनाथ मुंडेंच्या काळातील भाजपा आणि आजचा नवा भाजप यांची तुलना करताना अंबादास दानवे यांनी 'गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही असताना 'शब्दाला' किंमत होती, मातोश्रीवर किंवा तुमच्या बैठकीत एकदा जो निर्णय झाला, तो दगडावरची रेघ असायची. पण आजच्या भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी जुन्या मित्रांना, ज्यांनी त्यांना बोट धरून महाराष्ट्रात फिरायला शिकवले, त्यांनाच संपवण्याचा विडा उचलला आहे. राजकारणातली ती जुनी आदराची आणि विश्वासाची संस्कृती या नव्या भाजपने पार मोडीत काढली आहे, असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांना अनाहूत पत्र लिहले आहे. या पत्राची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Ambadas Danve
Ritabrata Banerjee: बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! ६० आमदारांच्या बंडखोर गटाला मान्यता, ऋतब्रता बॅनर्जी विरोधीपक्ष नेते

अंबादास दानवे यांनी गोपीनाथ मुंडे यांना लिहिलेले हे पत्र...

आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब,

सस्नेह जय महाराष्ट्र.

गोपीनाथजी मुंडे साहेब, आज अचानक तुमची खूप आठवण येते. तुम्ही आम्हाला सोडून गेलात, त्याला आता इतकी वर्षे झाली. पण आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा संघर्षाचा, मैत्रीचा आणि शब्दाचा विषय निघतो, तेव्हा तुमची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. आज महाराष्ट्राचे बदललेले राजकारण आणि तुमचा आजचा ‘भारतीय जनता पक्ष’ पाहिला, की मन अस्वस्थ होते. म्हणूनच एका जुन्या, कधीकाळी खांद्याला खांदा लावून लढलेल्या मित्रपक्षाचा सहकारी म्हणून हे अनाहूत पत्र तुम्हाला लिहित आहे.

तुम्हाला आठवतंय साहेब? आपल्या पक्षांनी एकत्र केलेल्या त्या सभा, तो संघर्ष, आणि ‘युती’चे ते सुवर्णदिवस? तेव्हा राजकारणात मतभेद असायचे, पण मनभेद नसायचे. आज मात्र सगळंच बदललंय. तुमच्या आजच्या भाजपबद्दल मनात काही तीव्र तक्रारी आणि खंत आहेत, त्या आज तुमच्याकडेच मांडतो.

१. मैत्रीची आणि शब्दाची किंमत संपली : गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही असताना 'शब्दाला' किंमत होती. मातोश्रीवर किंवा तुमच्या बैठकीत एकदा जो निर्णय झाला, तो दगडावरची रेघ असायची. पण आजच्या भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी जुन्या मित्रांना, ज्यांनी त्यांना बोट धरून महाराष्ट्रात फिरायला शिकवले, त्यांनाच संपवण्याचा विडा उचलला आहे. राजकारणातली ती जुनी आदराची आणि विश्वासाची संस्कृती या नव्या भाजपने पार मोडीत काढली आहे.

२. सत्तेसाठी कोणतीही तडजोड : तुम्ही विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला सळो की पळो करून सोडले होते. पण आजचा भाजप? सत्तेसाठी ते कोणासोबतही हातमिळवणी करायला तयार आहेत. कालपर्यंत ज्यांच्यावर तुमच्या आणि माझ्या पक्षांनी मिळून भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले होते, ज्यांच्यावर हे आरोप आपण तेव्हा केले, आज तेच लोक भारतीय जनता पक्षात मानाच्या खुर्च्यांवर बसले आहेत. ज्या तत्त्वांच्या पायावर आपण युती उभी केली होती, त्या तत्त्वांचा आज पक्षात जाहीर लिलाव होत आहे.

Ambadas Danve
Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची फेसबूकवर आक्षेपार्ह फोटोद्वारे बदनामी! 14 जणांवर गुन्हा दाखल

३. घरे फोडण्याचे आणि पक्ष पळवण्याचे राजकारण : आमच्या काळात आपण विचारसरणीच्या जोरावर निवडणुका लढायचो आणि जिंकायचो. आजचा भाजप मात्र ईडी, सीबीआय आणि पैशांच्या जोरावर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात, घरे उद्ध्वस्त करण्यात धन्यता मानत आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांचा राजकीय गेम करणे, हाच आजच्या भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. हे तुमचे संस्कार नक्कीच नव्हते.

४. अहंकाराचा अतिरेक : भाजपकडे सत्ता आली तेव्हाही तुमचे पाय कायम जमिनीवर होते. कार्यकर्त्याला आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना आपण नेहमी सन्मानाने वागवले. पण आजच्या भाजपच्या नेत्यांमध्ये सत्तेचा आणि बहुमताचा प्रचंड अहंकार दिसतो. ‘आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा’ या आविर्भावात आजचा पक्ष चालवला जात आहे. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देणे किंवा त्यांना गिळंकृत करणे हीच यांची रणनीती बनली आहे.

गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही आणि बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून जी युती महाराष्ट्राच्या मनामनात रुजवली होती, ती या नव्या भाजपच्या अहंकाराने आणि चाणक्यनीतीने पद्धतशीरपणे मोडीत काढली. आज तुम्ही असायला हवे होतात साहेब. तुम्ही असता तर आजच्या भारतीय जनता पक्षाला नक्कीच टोकले असते की, "सत्तेपेक्षा माणसांमधली विश्वासार्हता आणि मैत्री जास्त महत्त्वाची असते." पण आज तो सुसंस्कृतपणा आणि ती दिलदारी भारतीय जनता पक्षात उरलेली नाही, याची मोठी खंत वाटते.

तुम्हाला भावपूर्ण आदरांजली.

तुमचाच,

एक जुना चाहता आणि राजकीय सहप्रवासी

अंबादास दानवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com