YCMOU Exam Scam : अंगठा प्राध्यापकांचा अन् पेपर तपासले दुसऱ्यांनी; मुक्त विद्यापीठात 19 हजार उत्तरपत्रिकांचा घोटाळा, 48 जणांवर गुन्हा

YCMOU exam scam in Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा युनिट ३ व केंद्रीय मूल्यमापन कक्ष, नाशिक) मनोज नारायण घंटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा गैरप्रकार ९ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
YCMOU Exam Scam
YCMOU Answer Sheet ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News, 17 Nov : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बायोमेट्रिक यंत्रणेचा गैरवापर करून उत्तरपत्रिका तपासणीमध्ये मोठा गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिका संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या आणि विद्यापीठाची अधिकृत मान्यता नसलेल्या शिक्षकांकडून तपासून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह ४८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा मूल्यमापन केंद्रात हा प्रकार घडला. अधिकृत प्राध्यापकांचे केवळ बायोमेट्रिक अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांच्या नावाने ऑनलाइन लॉगिन तयार करण्यात आले. त्यानंतर या लॉगिनच्या माध्यमातून अनधिकृत शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्यात आल्या. या प्रक्रियेत विद्यापीठाची २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा युनिट ३ व केंद्रीय मूल्यमापन कक्ष, नाशिक) मनोज नारायण घंटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा गैरप्रकार ९ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठाने छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर काही अधिकृत प्राध्यापकांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संशयितांनी संगनमत करून या प्राध्यापकांचे केवळ बायोमेट्रिक अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर त्यांच्या नावाने ऑनलाइन लॉगिन आयडी तयार करून उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू केली. प्रत्यक्षात संबंधित प्राध्यापक केंद्रावर उपस्थित नसतानाही तेच उत्तरपत्रिका तपासत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.

या बनावट लॉगिनचा वापर करून संबंधित विषयांचे पुरेसे ज्ञान नसलेल्या आणि विद्यापीठाकडून अधिकृत नियुक्ती नसलेल्या शिक्षकांकडून तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. या कामासाठी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांचे मानधन घेण्यात आले. त्यातील काही रक्कम अनधिकृत शिक्षकांना देण्यात आली, तर उर्वरित रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

YCMOU Exam Scam
MLA viral video : आमदाराने भरसभेत विचारलं 'राजीनामा देऊ का?' समर्थकांनी जागेवरच कंडका पाडला, उत्तर ऐकून नेत्याची फजिती : VIDEO व्हायरल

पाच मुख्य संशयितांसह ४८ जणांवर गुन्हा

या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप राजाभाऊ धिरडे, परीक्षा मूल्यमापन केंद्राचे संचालक डॉ. मधुकर साठे, तांत्रिक सहायक दादासाहेब कन्हाळे, अंकुश गंगाराम पडाळे आणि प्रा. विशाल अशोकराव चपटे या पाच मुख्य संशयितांसह एकूण ४८ जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (१५ नोव्हेंबर) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशीत गैरप्रकार उघड

दरम्यान, नाशिक येथील मुक्त विद्यापीठाने केलेल्या अंतर्गत चौकशीत उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यापीठाच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली.

YCMOU Exam Scam
Maharashtra Gram Panchayat Fund : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 15 लाख मिळणार! मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा!

तर या प्रकरणासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जान्हवी शेखर यांच्याशी सकाळ ने संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव आणि या प्रकरणाचे तक्रारदार मनोज घंटे यांनाही रात्री उशिरापर्यंत कॉल केला. पण, पोलिसांपासून ते तक्रारदारापर्यंत सर्वांनी यावर मौन बाळगले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.