

Melghat News : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सावरघर येथील अदाणी ग्रीन एनर्जीच्या सहयोगी कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) खोदकाम आणि बांधकाम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातही अदानी समूहाच्या प्रकल्पावरून वातावरण तापले आहे.
चिखलदरा तालुक्यातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसैनिकांनी थेट प्रकल्पस्थळी जाऊन आंदोलन करत प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या बोअरवेलची तोडफोड केली. यावेळी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिल्याने हा विषय चर्चेत आला आहे.
१,५०० मेगावॉटचा प्रकल्प; २४० हेक्टर जंगलावर कुऱ्हाड?
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आडनदी परिसरात अदानी समूहाकडून १,५०० मेगावॉट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४० हेक्टर जंगलक्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक आदिवासी बांधवांकडून विरोध केला जात आहे.
प्रकल्पामुळे परिसरातील जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांवर परिणाम होण्याची भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जल, जंगल आणि जमिनीवरील स्थानिक आदिवासींच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता असल्याचा आक्षेपही घेण्यात येत आहे. या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी पर्यावरणप्रेमींकडून सुरू असल्याची माहिती आहे.
शिवसैनिक थेट प्रकल्पस्थळी; बोअरवेलची तोडफोड
दरम्यान, प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता आक्रमक वळण मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रकल्पस्थळी धडक देत आंदोलन केले. यावेळी प्रकल्पाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या बोअरवेलची तोडफोड करून ती बंद पाडण्यात आली.
शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रकल्पस्थळी जाऊन अदानी समूहाच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध केला. यावेळी त्यांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना उद्देशून आक्रमक भूमिका मांडली. 'ज्या कुऱ्हाडीने यापुढे झाडे तोडाल, त्याच कुऱ्हाडीने या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांचे हात छाटू,' असा धमकीवजा इशारा पराग गुडधे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
काँग्रेसचेही आंदोलन; आदिवासी बांधवांचे चिपको आंदोलन
या प्रकल्पाला काँग्रेसनेही विरोध दर्शविला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. वनविभागाची आवश्यक परवानगी नसतानाही परिसरातील अनेक झाडांची कत्तल करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. वृक्षतोडीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केले होते. जंगल वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असतानाच आता शिवसेनेनेही या संघर्षात उडी घेतली आहे.
एकीकडे सातारा जिल्ह्यातील सावरघर येथील अदानी समूहाच्या प्रकल्पावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मेळघाटातील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अदानी समूहाच्या जलविद्युत प्रकल्पांवरून राज्यातील पर्यावरण आणि राजकारणाचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.