

Maharashtra FDA : दूध, पनीर आणि अन्य अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
अन्न भेसळीचे प्रकार संघटित पद्धतीने होत असतील, तर संबंधितांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाईची शक्यता तपासावी, तसेच अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.
‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेबाबत बैठक झाली. या बैठकीत विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी अन्न भेसळीच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि अन्य अन्नपदार्थांच्या सेवनामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती किंवा टोळ्यांवर कोणतीही नरमाई दाखवू नये, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
भेसळखोरांवर कारवाई करताना केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये, तर न्यायालयीन प्रक्रियेतही प्रकरणे टिकतील यासाठी कायदेशीर बाजू मजबूत करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.
यासाठी नामवंत आणि ज्येष्ठ विधिज्ञांची मदत घेऊन विशेष कायदेविषयक पथक तातडीने स्थापन करावे, असेही त्यांनी सांगितले. कारवाईदरम्यान कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
दूध, पनीर आणि अन्य खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी तपासणी, नमुने घेणे, प्रयोगशाळा तपासणी आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. संघटित स्वरूपातील भेसळखोरीविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.