
BJP Politics : भारतीय जनता पक्ष हा शिस्तीसाठी ओळखला जातो. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणत या पक्षाने बदलत्या काळानूसार अनेक गोष्टी स्वीकारल्या, तडजोडी केल्या. यावरून विरोधकांनी या पक्षावर टीकाही केली. अजूनही पक्षातील नेते आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवण्यास धजावत नाही. ज्यांनी हे धाडस केले त्यांना याची मोठी किंमत देखील चुकवावी लागली. भाजपाच्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या त्याचे उदाहरण ठरतात.
आता पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्यानंतर पुन्हा त्यांनी वाद ओढावून घेतला आहे. गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्यांची राज्यात एवढी संख्या आहे, की त्यातून एक नवा पक्ष निर्माण होऊ शकतो, असं त्या बोलून गेल्या. समर्थकांकडून त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत असले तरी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची डोकेदुखी या नव्या विषयाने भविष्यात वाढू शकते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला. चुलत भावाकडून झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यातून त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांवर आरोप, टीका केली.
विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा कायम रोख होता. मंत्री पदाचा रुबाब, आमदारकी गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सातत्याने पक्षाच्या राज्यातील नेत्यांवर टीका केली. (BJP) भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती आणि संघटनेची जबाबदारी आल्यानंतर माझे नेते दिल्लीत आहेत, राज्यात माझा कोणी नेता नाही? इतपर्यंत त्यांनी भूमिका घेतली. अर्थात विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभेवर संधी देणे शक्य असताना राज्य व केंद्रातील नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना नवा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला. यातून पंकजा यांचा संताप होणे सहाजिक होते.
भाजपा हा माझ्या बापाचा पक्ष आहे, त्यांनी तो वाढवला मोठा केला या त्यांच्या दाव्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नव्हते. पण याचीही मोठी किमंत पंकजा मुंडे यांना मोजावी लागली. पाच वर्ष राजकारणातून एखाद्याला हद्दपार करावे, अशी अवस्था पंकजा मुंडे यांची झाली. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनातून मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन समाज रस्त्यावर उतरले आणि त्यातून पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा विषय समोर आला.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी बीड मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांना दिल्लीत पाठवून शांत करायचे, असा प्रयत्न झाला. पण मराठा आरक्षण आंदोलनाने पंकजा यांची दिल्लीवारी हुकली. महायुतीला राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाचा असा काही फटका बसला की मिशन 45 फेल झाले. 'तीन सौ पार' चा नारा देणाऱ्या भाजपाला केंद्रात सत्ता स्थापनेसाठी कुबड्या घ्याव्या लागल्या. ओबीसी समाजाच्या नाराजीची झळ बसलेल्या पक्ष नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत ही चूक सुधारली.
ती सुधारत असताना मराठवाडा आणि महाराष्ट्रात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग लक्षात घेता पकंजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाला अचानक वेग आला. आधी विधान परिषदेवर संधी आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्री पदावर वर्णी लावत पकंजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 मधील सरकारमध्ये ग्रामविकास आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालेल्या पंकजा यांना तुलनेने यावेळी दुय्यम खाते देण्यात आल्याचे दिसून आले. शिवाय परळीमधून निवडून आलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असल्याने त्यांना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणे जवळपास निश्चित होते.
परंतु पाच वर्ष राजकारणापासून दूर गेलेल्या पंकजा मुंडे यांनी ही तडजोड स्वीकारली. परंतु बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अशा काही घटना-घडामोडी घडल्या ज्यातून जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप यातून बीडचे पालकमंत्री पद अजित पवारांकडे जाणे पंकजा मुंडे यांना रुचले नाही. मला बीडचे पालकमंत्री पद मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता, असे त्यांनी बोलूनही दाखवले.
दुय्यम खाते, पालकमंत्री न मिळाल्याची सल
हक्काचा परळी मतदारसंघ सोडावा लागला, जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले नाही, महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात दुय्यम खाते मिळाल्याची नाराजी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून प्रकट होऊ लागली आहे. नाशिकमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या सांगताना राज्यात एक वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो, या त्यांच्या विधानाने पक्ष नेतृत्वाची वक्रदृष्टी पुन्हा त्यांच्याकडे फिरू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत, ओबीसी नेते आणि मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी पंकजा यांच्या विधानामुळे लागलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, आमचा त्यांना पाठिंबा असेल असे म्हटले आहे. तर भुजबळ यांनीही त्यांची री ओढत पंकजा मुंडे वेगळा पक्ष काढू शकतात? असे म्हणत त्यांच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण करण्यास हातभार लावला आहे.भाजपाच्या कोणत्याही बड्या नेत्याकडून पंकजा मुंडे यांच्या या विधानावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. पक्ष पातळीवर असलेली ही शांतता वादळापुर्वीची न ठरो एवढेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.