

महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांची शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भातील आक्रमक नेते बच्चू कडू यांच्यावर नव्या राजकीय जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली असून त्यांची विदर्भनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विदर्भाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शिवसेनेचा विदर्भात आणखी बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विदर्भातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पक्षविस्तार करणे आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणे, या दृष्टीने त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि शेतकरी वर्गात त्यांचा प्रभाव असल्याने आगामी काळात त्यांची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.निवडीनंतर समर्थकांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावरही बच्चू कडू यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या नवीन जबाबदारी नंतर बच्चू कडू यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. माझ्यावर विश्वास ठेवून मला शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदाची जबाबदारी दिल्याबद्दल शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे, पक्षातील सर्व वरिष्ठ नेते व माझ्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार, असे त्यांनी म्हटलं आहे.
ही केवळ पदाची जबाबदारी नसून विदर्भातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, युवक व वंचितांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याची नवी संधी आहे.शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि जनसामान्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष अधिक जोमाने विदर्भात पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.माझी नियुक्ती पद वाटपासाठी नाही तर सच्चा शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी आहे. इथे गटबाजीला थारा दिला जाणार नाही. शिवसैनिकांच्या ताकदीवर विदर्भाची बांधणी करायची आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासाला न्याय देत विदर्भात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार, असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.