

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीवरून राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली. या घटनेनंतर संघटनेने थेट MPSC च्या अध्यक्षांना इशारा दिला आहे.
MPSCचा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. “महेंद्र हरपाळकर यांच्या जी थोबाडीत मारली आहे, ती सरकारला जनतेच्या वतीने मारलेली थप्पड आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेने दिली.
3 ऑगस्टच्या आंदोलनाची आठवण
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीवर संभाजी ब्रिगेडने 3 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारला या प्रकरणी इशारा दिला होता, मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, असा आरोप संघटनेने केला.“सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यांना ज्या भाषेत समजते, त्या भाषेत सांगितले पाहिजे,” अशी टीका करत ही कारवाई संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
‘पुढचा नंबर MPSC अध्यक्षांचा’
पेपरफुटीच्या प्रकरणावरून MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणीही संभाजी ब्रिगेडने केली आहे. “MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही, तर पुढचा नंबर MPSC अध्यक्षांचा असेल, यात तिळमात्र शंका नाही,” असा थेट इशारा संघटनेने दिला आहे. या प्रकरणात आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही संघटनेने केला.
अण्णासाहेब सावंत, सुहास राणेंच्या पाठीशी संघटना
MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी घेतल्याचे संघटनेने म्हटले आहे. या दोघांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
पेपरफुटीविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होणार?
औषध निरीक्षक परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून MPSCविरोधातील आंदोलनाला आता आक्रमक वळण मिळाले आहे. तसेच संभाजी ब्रिगेडने थेट आयोगाच्या अध्यक्षांना इशारा दिल्याने पेपरफुटीच्या मुद्द्यावर आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.