

MSRTC update : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध सवलतधारक प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रवाशांना आता विशेष स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. एसटीचा वापर करताना या स्मार्ट कार्डचा वापर करता येईल. हे कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न केले जाणार असल्याने बोगस सवलतधारक प्रवाशांवर वचक ठेवणे सोपे होणार आहे.
एसटी महामंडळाने ‘RuPay On-The-Go’, NCMC सक्षम स्मार्ट कार्ड ही योजना तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत त्याचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे आणि सवलतधारक महिला संगिता पालकर व वर्षा कांबळे यांना स्मार्ट कार्ड देऊन योजनेची सुरूवात करण्यात आली.
प्रवाशांना कोणते फायदे?
स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. आधार क्रमांकाशी संलग्न NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने घेता येणार आहे.
राज्यातील एसटीचे सर्व आगार व बसस्थानकांवर सवलतधारक प्रवाशांना स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करता येईल. तसेच त्याच ठिकाणी त्यांना हे स्मार्ट कार्डचे वितरणही केले जाणार आहे. याशिवाय सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
प्रवाशांना स्मार्ट कार्डद्वारे वॉलेट टॉप-अपची सुविधा उपलब्ध राहणार असून, किमान १०० रुपयांपासून पासून टॉप-अप करता येईल. कार्डधारकांना बसमधील ईटीआयएम मशीन, संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच अधिकृत एजंटमार्फतही टॉप-अप करता येईल. पहिल्यांदा स्मार्ट कार्ड घेताना त्याची किंमत १९९ रुपये असणार आहे.
राज्याच्या एसटीसारख्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तर राज्याचे परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमामुळे राज्यातील लाखो सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.