Mumbai News : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षात आता निवडणुकीची लगीनघाई सुरु झाली आहे. मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. तर शिवसेना (उद्धव गट) चे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. याशिवाय, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची फोडाफोड केली जात आहे. शिंदेंच्या सेनेने ठाकरे गटाच्या नगरसेवकांना लक्ष्य केले आहे तर भाजपने इतर पक्षाचे नगरसेवक फोडण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नगरसेवक फोडाफोडीवरून भाजप, शिंदेंच्या सेनेत चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे.
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली होती. या उभ्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. या पक्षाचे मुंबई महापालिकेतील तीन डझनपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करीत आहेत तर भाजपने काँग्रेससह इतर पक्षातील नगरसेवक सोबत घेत मुंबई महापलिका ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे.
मुंबई महापालिकेवर 7 मार्च 2022 पासून प्रशासक राजवट आहे. आपापल्या प्रभागात सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक सक्रिय आहेत. विकासनिधीतून त्यांच्या प्रभागात कामे सुरू आहेत, मात्र विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांना कामच उरलेले नाही. त्यामुळे मुंबईतील बहुतांश नगरसेवक हे सत्ताधारी पक्षांना पसंती देत आहेत.
मुंबई पालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 36 माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व होऊ नये, यासाठी भाजपनेही इतर पक्षांचे नगरसेवक आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक फोडले आहेत. त्यामुळे भाजपने (BJP) देखील आतापासूनच जोरात तयारी सुरु केली आहे.
राजकारणात टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचे माजी नगरसेवकांना वाटू लागले आहे. सत्ताधाऱ्यांशी संबंधित राहिल्यास पक्षातील महत्त्वाचे पद, मागेपुढे निवडणुकीत तिकीट मिळू शकेल, विकासकामांसाठी निधी आणि राजकीय महत्त्व वाढेल, सत्तेचा थेट लाभ मिळेल, असे माजी नगरसेवकांना वाटत आहे. त्यामुळेच विकासकामे, निधी आणि राजकीय महत्त्व, सत्तेचा थेट लाभ, राजकीय अस्तित्वासाठी माजी नगरसेवक सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासून विरोधी नगरसेवकांची कामे ठप्प आहेत. त्यांना प्रभागात काम करता येत नाही, निधी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू झाली आहे. आतापर्यंत विविध पक्षांच्या सुमारे 80 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या पक्षात तर काही भाजपमध्ये दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले. विधानसभेत महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे मुंबईत बहुसंख्य नगरसेवकांचा भाजपकडे जाण्याचा ओढा आहे. जे थेट भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत, ते शिंदे गटाकडे जात आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीला प्राधान्य दिले आहे. त्यांच्याकडील माजी नगरसेवकांना प्रलोभने दाखविली जात आहेत, मात्र त्यांना रोखण्यात आणि विश्वास देण्यात उद्धव ठाकरे कमी पडत असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.