

Sindhudurg News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे.सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा फिस्कटल्यानंतर मनोज जरांगे यांनी शनिवारी (ता.30) भरउन्हात बाज टाकून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांचीही भूमिकाही समोर आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषणावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारलाही चार शब्द ऐकवले. ते म्हणाले, मनोज जरांगे हे भरउन्हात उपोषणाला बसले आहेत, असे सांगितले जात आहे. त्यांनी अशाप्रकारे भरउन्हात उपोषणला बसायला नको होतं. सरकारनेही त्यांना भरउन्हात उपोषण करण्यासाठी परवानगी द्यायला नको होती,असं रोखठोक भावना बोलून दाखवली.
नारायण राणे म्हणाले, मनोज जरांगेंनी भर उन्हात आंदोलन करायचं, मग सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी त्यांना जाऊन भेटायचं हे व्हायला नको. त्यांना या उपोषणादरम्यान काही झालं, तर त्यास सरकार जबाबदार राहणार असल्याचं मत व्यक्त केलं.
यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांनी सरकारवरही टीकेची तोफ डागली. सरकारही मराठ्यांच्या प्रश्नांना नेहमी विलंब करतं असा आरोप केला. तसेच त्यांनी जरांगे यांना सरसकट शब्द काढून टाकण्याबाबत आपण वारंवार सांगितलं असल्याचंही म्हटलं.
यावेळी नारायण राणे यांनी कुणब्यांना कुणबी समाजाचं आरक्षण द्यावं. त्यावर माझं काहीही म्हणणं नाही. पण मराठ्यांना कुणबी करा, अन् मराठा समाजाला आरक्षण द्या, याला माझा विरोध असल्याची ठाम भूमिका राणे यांनी यावेळी मांडली. मराठा आणि कुणबी यात फरक असून तो आजचा नसल्याचंही त्यांच्या विरोधामागचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, जो-तो श्रेय घेण्यासाठीच मनोज जरांगे यांना भेटत आहे. मराठे या राज्यात 32 टक्के आहेत. त्यांचा प्रश्न अगोदर हाताळला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे पाटील यांनी रणरणत्या उन्हात आपलं उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा अंतरवाली सराटीत आले होते. त्यांनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याबाबतची विनंतीही केली. मात्र, जरांगेंनी आपण उपोषण सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी विखे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्याचं विखे पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.