

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. मुंबईत गेल्या दोन दिवसापासून बैठकांवर बैठका होत आहेत. शनिवारी दिवसभरात कोअर कमिटीची दोन वेळा बैठक पार पडली. त्यानंतर कोअर कमिटीमधील नेत्यांनी सीएम फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीसांनी भाजप हायकमांडसोबत चर्चा करून निर्णय कळविणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या सर्व घडामोडीला २४ तासापेक्षा अधिकचा काळ झाला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्याबाबत कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्या देवगिरी या निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सम्रीर भुजबळ यांच्यासह बैठकीला दिग्गज नेतेमंडळी हजर आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या जागेवर उमेदवारी कोणाला याबाबतचा निर्णय झालेला नाही. दोन दिवसापासून बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे या जागेवर कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याचा पेच अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभेवर जाण्यास भुजबळ तयारही आहेत. त्यासाठी मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत एक अट घातली आहे .
मंत्री छगन भुजबळ यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी बैठकीत केली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ द्यावी, त्यानंतर मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेन, अशी अट ठेवली असल्याचे समजते. त्यानंतर शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी या नेतेमंडळींनी फडणवीसांकडे तसा आग्रह धरला आहे.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय असल्याने दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. छगन भुजबळांच्या अटीला २४ तास उलटून देखील अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे फडणवीसांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजप हायकमांडने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दर्शविल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही सांगितले जाते.
दरम्यान, दुसरीकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा देखील इच्छुक असून गेल्या चार दिवसापासून त्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. रविवारी सकाळी त्यांनी पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांची नाव चर्चेत आहेत, असे समोर येत आहे. त्यामुळे आता राज्यसभेची लॉटरी कुणाला लागणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.