

तळेगाव दाभाडे : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय घडामोडींना मंगळवारी निर्णायक वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी चार सदस्यांनी राजीनामे सादर केल्याने पक्षाच्या राजीनामा देणाऱ्या संचालकांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता समितीत भाजपचे केवळ पाच सदस्य उरले असून, कोरम पूर्ण होत नसल्याने बाजार समिती लवकरच बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज (मंगळवारी) शंकर वाजे, विलास मानकर, नामदेव शेलार आणि संभाजी शिंदे यांनी आपल्या सदस्यपदाचे राजीनामे सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केले. याआधी सोमवारी नऊ सदस्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मिळून असलेले सर्व १३ सदस्य आता समितीबाहेर पडले आहेत.
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ सदस्य होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आणि काँग्रेसचा १ असे १३ सदस्यांचे स्पष्ट बहुमत होते. मात्र सभापती निवडणुकीत बहुमत असूनही भाजपचे सुभाष जाधव ११ मतांनी विजयी झाले आणि सभापतीपद भाजपच्या ताब्यात गेले. या निकालानंतर तालुक्यात भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला होता.
दरम्यान, या पराभवानंतर आमदार सुनील शेळके यांनी तातडीची बैठक घेऊन भाजपला मतदान करणाऱ्यांना फैलावर घेतले.राष्ट्रवादीच्या सर्व १३ सदस्यांनी तातडीने राजीनामे सादर करावेत, अन्यथा पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार दोन दिवसांत सर्व १३ सदस्यांचे राजीनामे सादर झाले.
सभापतीपद भाजपकडे गेल्यानंतर साजरा झालेला आनंदोत्सव फार काळ टिकला नाही. राष्ट्रवादीने सर्व सदस्यांचे राजीनामे घेत बाजार समितीत मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा रंगली आहे. आता समितीत भाजपचे केवळ पाच सदस्य उरल्याने कोरमअभावी संस्था बरखास्त होण्याची शक्यता असून, भाजपच्या आनंदोत्सवावर पाणी फिरल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 13 सदस्यांचे राजीनामे प्राप्त झाले आहेत, अशी माहिती नवनाथ अनपट(सहाय्यक निबंधक, वडगाव) यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.