
Pune News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली.याच मागणीला तीव्र विरोध करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही आंदोलनं, मोर्चे, मेळावे, बैठका यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची ताकद एकत्र आणत मराठा नेते जरांगेंसमोर तगडं आव्हान उभं केलं. दिवसेंदिवस हाकेंकडे राज्यातील ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून राज्याच्या राजकारणात नावारुपास आले. आता हेच हाके मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी(ता.26)सोशल मीडियावर एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांची फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
लक्ष्मण हाके पोस्टमध्ये म्हणतात,‘मी प्रामाणिकपणे भांडतोय,ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिल्याची भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.
तसेच उपोषण आंदोलन असो की मोर्चे,एल्गार मेळावे असोत किंवा रॅली,तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात,मला पाठिंबा देत राहिलात,मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो,भांडत गेलो, ओबीसींच्या (OBC) छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो,लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नसल्याचंही लक्ष्मण हाकेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उद्या दैत्यानांदूर ता.पाथर्डी जि. अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन असंही नमूद केलं आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ उडवली आहे. त्यांनी मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत,त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो – लक्ष्मण हाके’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बीडमध्ये येत्या रविवारी (ता. 28 सप्टेंबर) ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा असे बॅनरवर म्हटले आहे.
बॅनरवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त श्रीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजातील नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनरचे फोटो व्हायरल झाले आहेत.
हाके यांना या मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले नाही का, हाकेंना या मेळाव्यातून जाणीवपूर्वक डावलण्यात आले का, समती परिषदेकडून हाके यांच्याबाबत ही भूमिका का घेण्यात आली, ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अद्याप आयोजकांकडून या बॅनरबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे समता परिषदेची हाकेंबाबत नेमकी भूमिका काय, हे समोर येऊ शकलेले नाही
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.