

OBC Reservation : राज्यातील रखडलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेसह राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या निवडणुका ओबीसी आरक्षणासंदर्भातील खटल्याच्या अंतिम निकालाच्या अधीन असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील आरक्षणाचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षणाच्या 15 पैकी पाच जागा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ओबीसी आरक्षणाचा खटला प्रलंबित; तरी निवडणुका घेण्याचे निर्देश
राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या असून अन्य 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप रखडल्या आहेत. ही बाब विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यावर भूमिका स्पष्ट करताना केवळ ओबीसी आरक्षणाचा खटला प्रलंबित असल्यामुळे लोकशाही प्रक्रिया थांबवून ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत, त्या घेता येतील; मात्र निवडणूक प्रक्रिया आणि निकाल ओबीसी आरक्षणाच्या खटल्यातील अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसींच्या पाच जागांचे काय?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया राबवताना 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेची घटनात्मक चौकट पाळावी लागणार आहे. त्यामुळे प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीमध्ये आवश्यक बदल करावे लागू शकतात. नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या 15 जागा आहेत. मात्र, 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे यातील पाच जागा कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे या जागांचे आरक्षण नेमके कसे निश्चित होणार, याकडे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यापूर्वीच निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या चौकटीत प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीत बदल करून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया आयोगाकडून राबवली जाऊ शकते.
नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय गणित बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक कधी जाहीर होते आणि ओबीसी आरक्षणाचे अंतिम स्वरूप काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबींसींच्या पाच जागा कमी होऊन त्या खुल्या प्रवर्गात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे महिला आरक्षण किती जागांवर पडणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.