Mumbai News: पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ते चार दिवस बेपत्ता होते. गुरूवारी ते घरी परतले आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगांना तिकीट नाकारण्यामागचे कारण पहिल्यांदाच सांगितले आहे.
वनगा हे चार दिवस अज्ञातस्थळी होती. त्यांचे मोबाईल बंद असल्याने संपर्कही होत नव्हता. उमेदवारी नाकारल्याने ते प्रचंड नाराज झाले होते. घरातून निघून जाण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीकाही केली होती. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र वनगा यांच्या पुनर्वसनाबाबत भाष्य केले आहे. ते निवडणुकीत पराभूत होण्याची शक्यता असल्याने उमेदवारी दिली नाही, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, वनगा यांना मी बोलवून सांगितले होते की, तुमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत आहे की, तुम्ही निवडून येणार नाही. तुम्ही पराभूत होणार.
मी वनगांना वाऱ्यावर सोडणार नाही, राजकीय पुनर्वसन करू, असे त्यावेळी सांगितले होते. कारण मी दिलेला शब्द पाळतो. आता त्यानंतर त्यांनी विश्वास ठेवायला हवा होता, अशी नाराजीही मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी व्यक्त केली. मला वाटते, ते मला येऊन भेटतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी भारतीय जनता पक्षाची चौथी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकनाथ शिंदेंकडे असलेल्या पालघरच्या जागेवर भाजपने राजेंद्र गावीत यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलल्याचं उघड झालं. त्यामुळे वनगा प्रचंड नाराज झाले होते. माध्यमांशी बोलताना ते ढसाढसा रडले होते. त्यानंतर कुणालाही न सांगता ते अज्ञातस्थळी निघून गेले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.