Satara Dcc Bank Election : 10 वर्षांच्या नियमांचा दिग्गजांना दणका : सातारा जिल्हा बॅंकेसाठी अशा रंगणार लढती...

Reserve Bank’s 10-year rule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दहा वर्षांच्या संचालक कार्यकाळाच्या नियमामुळे राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे हे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले. या निर्णयामुळे इतर उमेदवारांसमोर कायदेशीर पेच निर्माण होऊन काहींच्या बिनविरोध निवडीची शक्यता वाढली.
Satara Dcc Bank Election
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 18 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, या रिझर्व्ह बॅंकेच्या अधिनियमाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दिग्गजांना मोठा दणका बसला आहे. न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माणमधील अनिल देसाई आणि महाबळेश्वरमधील राजेंद्र राजपुरे या दोन दिग्गज संचालकांना अपात्र ठरवून इतरांच्या उमेदवारीपुढे कायदेशीर पेच उभा केला आहे. तसेच, या नियमांमुळे जिल्ह्यातील लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता असून काहींना बिनविरोधची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.

सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक लागण्याच्या आधीपासून रिझर्व्ह बॅंकेच्या या नवीन अधिनियमाने प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र, या कालावधीत राज्य सरकार किंवा सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाही. रिझर्व्ह बॅंकेचा हा अधिनियम राज्य सरकारने सहकारी संस्थांना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय झाला, त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बॅंका या राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांच्या ताब्यात होत्या. ज्या उद्देशाने हा अधिनियम आणला गेला, त्याचा फटका विरोधकांना बसण्याऐवजी खुद्द सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनाच बसला आहे. राष्ट्रवादीचे दोन संचालक अपात्र ठरले असले, तरी महायुतीच्या घटक पक्षातील संचालकही यामुळे अडचणीत सापडले आहेत.

दिग्‍गजातील काहींनी उमेदवारीसोबत पर्यायी अर्ज भरले आहेत. त्यामुळे १० वर्षांचा मुद्दा निघाल्यास पर्यायही उपलब्ध करून ठेवलेला आहे, त्यामुळे काहींना बिनविरोधची संधी, तर काही नवीन चेहऱ्यांना बॅंकेचा संचालक होण्याचा मान मिळणार आहे.

सात जणांची अडचण

सातारा जिल्हा बॅंकेत सध्‍या संचालकपदाचा १० वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्‍यांची संख्‍या सात आहे. यात बिनविरोध निवडले गेलेले खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विद्यमान अध्यक्ष खासदार नितीन पाटील, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे यांचा समावेश आहे.

Satara Dcc Bank Election
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेंचा कऱ्हाडमधून कडक इशारा : ‘मी येणार म्हणून हॉटेल बंद ठेवले असतील तर...’

सातारा : शिवेंद्रराजेंच्या निर्णयावर लढत ठरणार

सातारा विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह काँग्रेसचे बाबासाहेब कदम, तसेच शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक सर्जेराव सावंत यांचा अर्ज आहे. आता रिझर्व्ह बॅंकेच्या या नियमामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या जागी सर्जेराव सावंत आणि बाबासाहेब कदम यांच्‍यात लढत होण्याची शक्‍यता आहे.

वाई : मकरंदआबांचा निर्णय काय होणार

वाई सोसायटीतून खासदार नितीन पाटील यांच्यासह मंत्री मकरंद पाटील व सत्यजित वीर यांचे अर्ज असून, मकरंद पाटील यांचा खरेदी-विक्री संघातून अर्ज आहे. आता ते सोसायटीतून लढणार, की खरेदी-विक्री संघातून याची उत्सुकता आहे. मकरंद पाटील यांच्या विरोधात खरेदी-विक्री संघातून फलटणचे विश्वासराव निंबाळकर यांचा अर्ज आहे.

मकरंद पाटील सोसायटीतून लढले, तर सत्यजित वीर यांना माघार घ्यावी लागणार आहे. तसे झाल्यास खरेदी- विक्री संघ मतदारसंघातून विश्वासराव निंबाळकर यांना बिनविरोधची लॉटरी लागेल. मंत्री मकरंद पाटील खरेदी-विक्री संघातून लढले, तर वाई सोसायटीतून सत्यजित वीर यांना बिनविरोधची लॉटरी लागणार आहे.

गृहनिर्माण-दुग्ध संस्था : उदयनराजेंबाबत काय निर्णय होणार

गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून डी. के. पवार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले बिनविरोधच्या वाटेवर होते. त्यांच्याबरोबरच त्यांचे समर्थक काका धुमाळ यांचा अर्ज ठेवण्यात आला आहे. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे खासदार उदयनराजेंनी माघार घेतल्यास त्यांचे समर्थक व प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध वर्णी लागू शकेल.

फलटण : संजीवराजे-समशेरसिंह आमने सामने, अतुल भोसलेंनाही संधी?

फलटण विकास सोसायटी मतदारसंघातून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह संजीवराजे निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, तुकाराम शिंदे यांचे अर्ज आहेत. सोसायटीतून माजी सभापती रामराजेंनी माघार घेतल्यास येथे संजीवराजे नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होईल, तर माजी सभापती रामराजेंचा कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्थेतील अर्ज माघार गेल्यास येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

महाबळेश्वर : संजय मोरेंचे स्वप्न भंगले

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे व त्यांची पत्नी रूपाली राजपुरे यांना अपात्र करण्याबाबत संजय मोरे यांची याचिका होती; ती मंजूर केल्यामुळे दोघे पती, पत्नी अपात्र ठरले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने रुपाली राजपुरे यांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे संजय मोरे यांचे बिनविरोधचे स्वप्न भंगले आहे.

खटाव : इंदिरा घार्गे लढणार...

खटाव सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक प्रभाकर घार्गे यांनी अर्ज भरलेला आहे. त्यांनी 10 वर्षांच्या नियमामुळे माघार घेतल्यास त्यांच्याऐवजी त्यांच्‍या पत्नी इंदिरा घार्गे निवडणूक लढतील. या मतदारसंघात सुनीता कदम, नंदकुमार मोरे, धनंजय चव्हाण यांचे अर्ज असल्याने येथे चुरस पाहायला मिळेल.

Satara Dcc Bank Election
Gokul Election : बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळच्या निवडणुकीत 'धार्मिक तांडव'; माजी आमदाराचे धक्कादायक विधान

इतर मागास प्रवर्ग : प्रदीप विधातेंचे चिरंजीव रिंगणात उतरणार?

इतर मागास प्रवर्गातून विद्यमान संचालक प्रदीप विधाते यांनी अर्ज भरलेला आहे, त्यांनी १० वर्षांच्या नियमातून माघार घेतल्यास त्यांचे चिरंजीव प्रतीक विधाते रिंगणात असतील. पण, या मतदारसंघातून तब्बल २० जण रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची असेल. महिला राखीव, तसेच इतर मागास प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यमान संचालिका कांचन साळुंखे यांना १० वर्षांच्या नियमामुळे माघार घ्यावी लागल्यास त्यांचे दोन्ही मतदारसंघातील आव्हान संपुष्टात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com