-सचिन शिंदे
karad Crime News : पोलिसांनी कराड येथे केलेल्या कारवाईत तब्बल १४ पिस्तुल व २२ काडतुसे जप्त केली आहेत. एकाच रात्री, एकाच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात पिस्तूल जप्त होण्याची पहिलीच वेळ आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दहा जणांना ताब्यात घेतले आहे. ते दरोड्याच्या तयारीत असताना त्यांना जेरबंद केले. विशेष म्हणजे हे सर्व गुन्हेगार कराड शहर परिसरातील आहेत.
या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकारांना दिली. या पिस्तूल कोठून आणल्या, त्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याच्या मुळाशी आम्ही लवकरच पोहचू, असेही श्री. शेख यांनी स्पष्ट केले. एसपी समीर शेख म्हणाले, टोळीतील संशयितांकडून पिस्तूलसह जिवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीचा गुन्हा नोंदवला आहे.
सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी) अमित हणमंत कदम (रा. अंतवडी), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कऱ्हाड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर-कऱ्हाड), वाहीद बाबासाहेब मुल्ला (रा. विंग), हर्ष अनिल चंदवानी व रिजवान रज्जाक नदाफ (दोघे, रा. मलकापूर), चेतन शाम देवकुळे , बजरंग सुरेश माने (दोघे, रा. बुधवार पेठ) व किशोर पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या टोळीतील बहुतांश जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. कऱ्हाड व परिसरात पिस्तूल आल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शहरात कोंबींग ऑपरेशन राबवले. त्याचवेळी पोलीस निरीक्षक देवकर यांना खबऱ्यामार्फत कऱ्हाड - विटा रस्त्यावरील राजमाचीच्या हद्दीत जानाई मळाई मंदिराजवळ काही लोक जमल्याची माहिती मिळाली.
तसेच रस्त्याच्या बाजूच्या उसाच्या शेताजवळ ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, असेही समजले होते. त्यानुसार ते पथकास घेवून त्या बाजूला रवाना झाले. त्यानुसार त्यांनी अन्य अधिकारी व पोलिसांना दोन पंचांसह बोलावले. ऊसाच्या शेतालगत आडोशास बसलेल्या दहा जणांना हटकले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांना ताणून पकडले. त्यांच्या ताब्यातून नऊ लाख ११ हजार ९०० रूपयांच्या १४ देशी बनावटीच्या पिस्तूल व २२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
रात्रभर जागली एलसीबी
संशयितांकडून १४ देशी बनावटीची पिस्तलसह २२ काडतुसे जप्त करण्यासाठी एलसीबी रात्रभर जागली. अधीक्षक शेख, अपर अधीक्षक बापू बांगर यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. उपाधीक्षक रणजित पाटील, अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, एलसीबीचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.