Kolhapur Election: मागील दोन विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्याने आपण तुम्हाला पुढील संधी देऊ, असा शब्द माजी आमदार केपी पाटील यांनी फिरवल्यानंतर मेव्हण्या पाहुण्यांच्यात बिनसले आहे. केपी पाटील यांचे सख्खे मेहुणे ए वाय पाटीलच त्यांच्या विरोधात उतरल्यानंतर ' 'दोघात तिसरा सगळच विसरा'असं गणित या मतदारसंघात होताना पाहायला मिळत आहे. ए. वाय. पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने केपी अडचणीत सापडले आहेत.
राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून सातजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील व बंडखोर उमेदवार जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. विकास कामाच्या जोरावर आबिटकर यांची लढाई एकतर्फी सुरू आहे. पण एकतर्फी करण्या पाठीमागे मेव्हण्या पाहुण्यांची लढत कारणीभूत ठरत आहे.
महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारीबाबत आपेक्षाभंग झाल्याने ए. वाय. पाटील यांनी बंडाचा झेंडा घेऊन आव्हान उभे केले आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत शब्द डावल्याने ए वाय यांची नाराजी आहे. बिद्री कारखान्यात के पी पाटील यांनी विजय मिळवला असला तरी विधानसभेला त्यांची वाट खडतर आहे.
आमदार आबिटकर यांची विकासकामे, थेट जनतेशी संपर्क, अरुण डोंगळे गटाची साथ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची होणारी मदत, भाजप, धनंजय महाडिक युवाशक्ती, आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा एक गट यावर आमदार अबिटकरांची मदार आहे. के. पी. पाटील हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, ठाकरे शिवसेना यांच्यावर मदार आहे. मात्र के पी पाटील यांच्या बद्दल त्या राजकीय भूमिकेमुळे अडचणीत वाढ झाली आहे.
गेल्या महिनाभरात त्यांनी तीन पक्ष बदलून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. राजकीय भूमिका सोयीस्कर घेणे हे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. लढती वेगवेगळ्या असल्या तरी राजकीय डाव-प्रतिडाव खेळल्याचे नाव व चिन्हावरून दिसते. ए. वाय. पाटील यांनी ट्रम्पेट (तुतारी) हे चिन्ह जाणीवपूर्वक निवडले, तर के. पी. पाटील यांच्या नावाचे दुसरे उमेदवार शिरगावचे के. पी. पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
मागील दोन विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवण्याचा मानस असलेल्या ए वाय पाटील यांना के पी पाटील यांच्या उमेदवारीमुळे माघार घेण्याची वेळ आली. मात्र पुढीलवेळी आपल्याला संधी देऊ असा शब्द माजी आमदार के पी पाटील यांनी दिल्यानंतर बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत देखील ए वाय पाटील यांना डावलले. त्यामुळे बंडखोरी करत ए वाय पाटील यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी गटात जाण्याचा निर्णय घेतला. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून माजी आमदार के. पी. पाटील व त्यांचे दस्तुरखुद्द मेव्हुणे ए. वाय. पाटील यांच्यातील राजकीय वैर पेटले आहे.
लोकसभा निवडणुकीत ए वाय पाटील यांनी महाविकास आघाडीला साथ दिली. तर के पी पाटील यांनी पडद्या मागून महायुतीमध्ये राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य केले. विधानसभेच्या उमेदवारी मिळविण्या वरुन मेव्हूणे-पाहूण्यात जोराचा संघर्ष उफाळून आला. दोघांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अक्षरशः उंबरे झिजविले. ए वाय पाटील यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर केपी पाटील त्यांनी उमेदवारी हिसकावून आणली. त्यामुळे हा संघर्ष आणखीन उफाळला.
के पी पाटील यांच्याशी राधानगरी एकाकी सांभाळणाऱ्या ए वाय पाटील यांनाच धक्का दिल्याने नाराज झालेले एवाय यांनी अपक्ष निवडणुकित उतरून केपी यांना आव्हान उभा केली आहे. त्यामुळे ए. वाय. पाटील यांची उमेदवारी केपींना अडचणीत आणणारी आहे. ए. वाय. पाटील राधानगरी ३५ हजारांपेक्षा अधिक मते घेण्याची शक्यता असल्याने केपींच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. त्यांचा फायदा आबिटकर यांना होऊ शकतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.