
Satara, 27 May : गेली काही दिवसांपासून चर्चेत असलेला पाटणकर गटाचा मेळावा सोमवारी (ता. 26 मे) झाला. या मेळाव्यात पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी गेली 11वर्षांपासून विरोधकांकडून विशेषतः मंत्री शंभूराज देसाई गटाकडून होणारा त्रास जाहीरपणे मांडला. विरोधकांकडून होणारी अडवणूक, कार्यकर्त्यांची गळचेपी, पिळवणूक आणि दबावाचे राजकारण हा सर्व त्रास सहन करण्याची मर्यादा आता संपली आहे, त्यामुळे भाजपसोबत चला, असा आग्रह कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडे धरला.
कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पाटणकर गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर (Satyajeetsinh Patankar) यांनीही गेली चाळीस वर्षे सकारात्मक राजकारण केले. पण आता परिस्थिती वेगळी आहे, नव्या विचारांच्या सोबत आपल्याला जावे लागणार आहे, असे सांगून भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे पाटणकर यांचा भाजप प्रवेशाच्या तारखेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
पाटण (Patan) विधानसभा मतदारसंघातील राजकीय ध्येयधोरण ठरविण्यासाठी पाटणमधील श्रीराम मंदिरात सोमवारी पाटणकर गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीला सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंदूराव पाटील, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, याज्ञसेन पाटणकर यांच्यासह पाटणकर गटाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला उपस्थित होत्या.
कार्यकर्त्यांनी गेल्या ११ वर्षांत आलेले कटू अनुभव तीव्र शब्दांत मांडले. विशेषतः मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाकडून दिलेला जाणारा त्रास, होणारी अडवणूक, विकासकामात आणि निधीमध्ये होणारी अडवाअडवी यामुळे पाटणकर गटातील कार्यकर्त्यांची कोंडी होत होती. कार्यकर्त्यांची पिळवणूक, अडवणूक आणि जबरदस्तीने झालेले पक्षप्रवेश आणि दबावाचे राजकारण यामुळे संपूर्ण पाटणकर गटात कमालीचा राग होता. तो कालच्या मेळाव्यातून बाहेर आला आणि आता सहन करण्याची मर्यादा संपलीय भाजपसोबत चला, अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडे केली.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, गेली ४० वर्षे आपण सकारात्मक राजकारण केले. त्या वाटचालीत सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेतले. मात्र, सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही. विकास कामे करताना अडचणीत येत आहेत. कार्यकर्त्यांचीही अडवणूक केली जात आहे, त्यामुळे नवीन संकल्पना व नवीन विचारांच्या सोबत आपल्याला जावे लागणार आहे.
नवीन विचाराच्या लोकांसोबत जाण्यापूर्वी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटना या सर्वांशी चर्चा केली जाईल. तसेच वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय केला जाईल, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. तो निर्णय आपल्या सर्वांना सांगितला जाईल. ज्या ठिकाणी आपण जाणार आहेात, तिथेही निश्चितपणे त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जातील. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सत्ता प्राप्त केली जाईल, असा विश्वासही पाटणकर यांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.