

Phaltan, 03 February : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतल्यानंतर कनिष्ठ मंत्र्यांना विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयक्षमतेवर शंका घेण्याचे कारण नाही, असा सडेतोड खुलासा करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. सहा महिन्याला पक्ष बदलणाऱ्यांच्या संगतीत बसून साखरवाडी येथील सभेत माझ्यावर टीका करण्यात आली असावी, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
सुरवडी (ता. फलटण Phaltan) येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेतून परतल्यानंतर त्यांनी स्वतः मला दूरध्वनीवरून नाईकबोंमवाडी एमआयडीसी प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. या प्रकल्पाबाबत उद्योग मंत्र्यांना काही शंका असतील, तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी समक्ष चर्चा करावी.
खुद्द मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) या प्रकल्पाबाबत जाहीरपणे स्पष्ट भूमिका मांडली आहे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती असताना नाईकबोमवाडी येथील एमआयडीसी रद्द किंवा स्थगित करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली होती. नाईकबोंमवाडी एमआयडीसीमुळे
फलटण तालुक्यातील १० ते २० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असताना केवळ राजकीय आकसातून हा प्रकल्प बंद पाडण्याचे प्रयत्न झाले, असा आरोपही त्यांनी केला.
रणजितसिंह म्हणाले, आपण तरुण आहात, सकारात्मक राजकारण करायला हवे. मात्र साखरवाडी येथील सभेत तुम्ही नाईकबोमवाडी एमआयडीसी स्थगित करण्याची मागणी केली. याचे लाईव्ह रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. (स्व.) आमदार चिमणराव कदम यांनी गिरवी रोडला ग्रामीण रुग्णालय सुरू केले. ते होऊ नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैवी आहे, अशी टीकाही सह्याद्री कदम यांच्यावर केली.
शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, ज्या पवार कुटुंबीयांनी रामराजेंना कायम सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवले, पक्षविरोधी काम करूनही आमदारकी अबाधित ठेवली, त्यांच्याच बाबतीत कृतज्ञता विसरली गेली. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांची गटनेतेपदी निवड होत असताना त्या बैठकीला गैरहजर राहून रामराजे साखरवाडीत शिवसेनेचा प्रचार करत होते, असा आरोपही खर्डेकर यांनी केला.
ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील म्हणाले, या एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला होता. कोणताही त्रास न होता हा प्रकल्प मार्गी लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी ओमप्रकाश गुप्ता यांनी माझ्या सहकार्याबद्दल काळभैरव मंदिरात येऊन माझा सन्मान केला होता. स्वतःला एमआयडीसीचा जनक म्हणवणाऱ्यांचा या प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. तसेच, कमिन्स कंपनी ही केवळ शरद पवार यांच्या कृपेमुळेच फलटणला आली, असा दावाही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.