Solapur, 12 October : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर मनोहर सपाटे यांनी उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे या मतदारसंघातून निवडणुकीची जय्यत तयारी केलेले माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांच्या आमदारीसमोर पुन्हा एकदा सपाटे यांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत मनोहर सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने कोठे यांची आमदारकीची संधी हुकली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar Party) नुकत्याच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून एकमेव माजी महापौर महेश कोठे यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुलाखत दिली आहे, त्यामुळे ‘सोलापूर शहर उत्तर’मधून कोठे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच आता माजी महापौर सपाटेही उमेदवारीच्या स्पर्धेत उतरले आहेत, त्यामुळे तुतारीच्या उमेदवारीसाठी सोलापूरच्या दोन माजी महापौरांमध्ये चुरस लागण्याची चिन्हे आहेत.
महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी गेल्या वर्षभरापासून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. त्यांच्या समर्थकांकडून शहर उत्तर मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे, त्यामुळे सोलापूर शहर उत्तरमधून कोठे यांची उमेदवारी पक्की मानली जात असतानाच आता मनोहर सपाटेही (Manohar Sapate) उमेदवारीसाठी रिंगणात उतरले आहेत. सोलापूर शहर उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपल्यानंतर मनोहर सपाटे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. आपण शरद पवार यांच्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिलो आहे. गेल्या 45 वर्षांपासून प्रथम काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीत विविध पदावर काम केले आहे.
माझ्यावर आतापर्यंत झालेला अन्याय दूर करण्यासाठी मला आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मधून उमेदवारी मिळावी, अशी मागणी सपाटे यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली आहे, त्यामुळे मुलाखत प्रक्रिया संपल्यानंतर आलेल्या मागणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विचार केला जातो, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून 2009 मध्ये विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात महेश कोठे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले मनोहर सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल 14 हजार 624 मते घेतली होती.
विशेष म्हणजे याच निवडणुकीत कोठे आणि देशमुख यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. यात कोठे यांचा 10 हजार 090 मतांनी पराभव झाला होता, त्या निवडणुकीत सपाटे यांच्यामुळे आपला पराभव झाला, ही सल महेश कोठे यांच्या मनात अजूनही सलत आहे, त्यामुळे कोठे यांच्या आमदारकीच्या मार्गात सपाटे यांचा पुन्हा एकदा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.