
Satara, 21 April : सर्वसामान्य कुटुंबातून मी राजकारणात आलो, आमदार झालो. राज्याचा मंत्री झालो आणि त्यातही सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, हे विरोधकांना रुचलेले नाही. माझ्या विरोधकांच्या औलादी मर्दाच्या नाहीत. त्यांच्यात मैदानात लढण्याची धमक नाही, त्यामुळेच माझ्या विरोधात गेली १६ वर्षे षडयंत्रे रचली जात आहेत. मात्र, आता सावज टप्प्यात आले आहे. कोण कुठे आणि कुणाबरोबर बसला, कुणाशी बोलला, कुणाला सोबत घेतले, कुणाला किती पैसे द्यायचे ठरले, याची इत्यंभूत माहिती मिळाली आहे, त्या सर्वांचा कार्यक्रम लागणार आहे, असा कडक इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.
बिदाल येथे जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना मंत्री गोरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मी गेली १६ वर्षांपासून प्रस्थापितांविरोधात संघर्ष करत आहे. पण, मी चार वेळा आमदार झालो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्री केले.
सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री करून मला विठुरायाच्या नगरीची सेवा करायची आणि आषाढी वारीचे नियोजन करण्याची संधी मला देवाने दिली. मात्र, माझ्या विरोधकांना तो आनंद मला मिळू द्यायचा नव्हता, त्यामुळेच माझ्याविरोधात निवडणूकीपूर्वी, निवडणुकीनंतर, मंत्रीपद मिळू नये म्हणून आणि मंत्रीपद मिळाल्यावरही षडयंत्रे रचण्यात आली. मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे.
जनतेच्या आशीर्वादामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा विरोधकांच्या छताडावर पाय ठेवून ठामपणे उभा आहे. माझ्या विरोधकांमध्ये मैदानात समोरासमोर येऊन लढण्याची हिम्मत नाही, ते पळपुटे अहोत. मी एक तर कोणाच्या वाट्याला जात नाही. पण माझ्या वाटेला कोणी आले तर सोडत नाही. सावज टप्यात आल्याशिवाय मी काही करत नाही. आता सगळी सावज टप्प्यात आली आहेत. पण, त्यांच्यात आता पळापळ सुरू झाली आहे, असा टोलाही गोरे यांनी लगावला.
गोरे म्हणाले, माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही, मी त्या षडयंत्रात सहभागी नाही, माझा काही संबंध नाही, हे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. पण आता सगळ्यांचेच पुरावे आले आहेत, त्यामुळे त्या सर्वांचा हिशेब होणार आहे. आणखी काही महत्वाची माहिती मिळाली आहे, त्यामुळे षडयंत्रात सहभागी असणाऱ्या सर्वांचा कार्यक्रम लागणार आहे.
मी आजपर्यंतच्या राजकीय जीवनात खूप सहन केले आहे. देवाने मला ती ताकद दिलेली आहे. विरोधकांनी फक्त एक टक्के तरी सहन करून दाखवावे. त्यांनी एकदा तरी मैदानात येऊन लढावे. मला कोणताही राजकीय इतिहास नव्हता, आमचा इतिहास आम्हीच लिहियला सुरुवात केली आहे. पूर्वजांच्या पुण्याईवर काम करणाऱ्यांनी षडयंत्रे रचण्याचे उद्योग बंद करावेत, असेही गोरे यांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.