

Satara, 29 September : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील कटू अनुभवानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत जाणार का याची उत्सुकता होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निरोपानंतर सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढण्यावर जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींचे एकमत झाले. त्यानुसार आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत बैठक झाली. मात्र, या बैठकीला पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीतच महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे त्याची वेगळीच चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नितीन पाटील, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. सुमारे तासभर झालेल्या बैठकीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यात आली.
बैठकीला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री शंभूराज देसाई कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. बैठकांचे सत्र सुरू असतानाच माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि संजीवराजे नाईक- निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, सत्यजित पाटणकर, याज्ञसेन पाटणकर या नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. सायंकाळी शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेऊन या निवडणुकीच्या रणनीतीविषयी चर्चा केली.
दरम्यान, लवकरच आणखी एक बैठक घेऊन जागा वाटपाचे सूत्र ठरविले जाणार असल्याचे बैठकीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून होणार, हे स्पष्ट झाले आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत, असे सांगितले. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तशी सूचना आली आहे. लवकरच आणखी एखादी बैठक होणार असून, त्यामध्ये जागा वाटपाविषयी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार नितीन पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेची निवडणूक लढण्याचे ठरले आहे. जागा वाटप हे मतांच्या आकडेवारीनुसार ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राजेंमध्ये तासभर चर्चा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीची जिल्ह्यात चर्चा आहे.
मंत्री देसाई, गोरेंची अनुपस्थिती
पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती होती. याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शंभूराज देसाई हे कामानिमित्त मुंबईला असल्याने ते बैठकीस येऊ शकले नाहीत. मंत्री गोरे हे कामानिमित्त बाहेर असल्याने तेही येऊ शकले नाहीत; पण त्यांच्याशी यापूर्वी जिल्हा बॅंकेच्या संदर्भात चर्चा झालेली आहे.
प्रमुख घडामोडी
रामराजे नाईक निंबाळकर यांचे सोसायटी, कृषी प्रक्रिया या दोन मतदारसंघातून दोन अर्ज
पाटण सोसायटीतून सत्यजित, याज्ञसेन पाटणकरांचे अर्ज
आमदार मनोज घोरपडेंचा नागरी बॅंका पतसंस्था गटातून अर्ज
कऱ्हाड सोसायटीतून उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा अर्ज
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.