

Kolhapur News, 29 Sep : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणधुमाळी सुरू असताना, इकडे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सभा यंदा पहिल्यांदाच खेळीमेळीच्या वातावरणात होत आहे. दरवर्षी आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमल महाडिक यांच्या गटाला प्रतिआव्हान दिले जाते.
मात्र, यंदा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांमध्ये समझोता एक्सप्रेस धावली आहे की काय, असा सवाल सभेदरम्यान उपस्थित होत आहे. अशातच आमदार अमल महाडिक यांच्याकडून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विधानाला पुन्हा एकदा महत्त्व आले आहे.
चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ ही प्रमुख मंडळी गोकुळ निवडणूक सामंजस्याने पुढे घेऊन जाण्याबाबत निर्णय घेतील. शौमिका महाडिक यांनी बिनविरोधबाबत त्यांचे व्यक्तिगत मत मांडले आहे. गोकुळ निवडणुकीचा त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. सतेज पाटील आणि महायुतीच्या नेत्यांनी सामंजस्याने निर्णय घ्यावा, असे माझेही मत आहे. असे वक्तव्य करून अमल महाडिक यांनीही बिनविरोध करण्याची भूमिका मांडली.
छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या सभेमध्ये नेहमीच पहिल्यापासून आम्ही आमची आणि ते त्यांची भूमिका मांडत आलेले आहेत. आता त्या लोकांनीदेखील कारखान्यावर विश्वास टाकला आहे. त्यांचे मी स्वागत करतो. कारखान्यात डेव्हलपमेंट झाली आहे, हे त्यांनाही मान्य आहे. दुष्काळाचे संकट राज्यावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकमेकांना साथ देऊन सकारात्मकपणे पुढे जाण्यासाठीच हे पहिले पाऊल असेल, असे म्हणत महाडिक-पाटील वादावर हे मोठे विधान आमदार अमल महाडिक यांनी केले आहे.
राजाराम कारखाना खासगीकरणातून सहकारात आणण्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील यांची देखील महत्त्वाची भूमिका आणि योगदान राहिले आहे. त्यांच्या योगदानाचा उल्लेख करणे गरजेचे आहे, असेही आमदार महाडिक म्हणाले. सप्टेंबर महिन्यात परतीचा मोठा पाऊस पडतो; मात्र, यावेळी जिल्ह्यात चित्र वेगळे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे.
शेतकरी चिंतेत आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय आम्ही घेऊ. परिवार म्हणून एक छोटी मदत करावी, असे मला वाटले. यातून मला जे शक्य आहे, ते मी करत आहे. येणारे सण साधेपणाने साजरे करून दुष्काळग्रस्तांना मदत करता येईल. फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत जाहीर केली आहे. मी आणि आमचे कार्यकर्ते मिळून जिल्ह्यातील एक दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेण्याचा आमचा संकल्प आहे. दसरा-दिवाळी साधेपणाने साजरी करून ती मदत एका परिवाराला करावी, असे माझे आवाहन असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.