Ahmednagar News : थोरात-कोल्हे विरुद्ध विखे अशी लढत झाल्याने राज्यात श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गाजली. यात थोरात-कोल्हे गटाने कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन करत कारखान्यावरील 'विखे' राज संपवले. मात्र, नेहमीच आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीगणेश कारखान्यास चालू गळीत हंगामासाठी अपेक्षित कर्ज जिल्हा सहकारी बँकेकडून मिळण्यात अडचणी येत असताना, पुन्हा थोरात-कोल्हे विरुद्ध विखे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. (Latest Marathi News)
जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्याची श्रीगणेश कारखान्यावर अटी-शर्ती लावून राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याच्या वाटेत काटे टाकत असल्याचा आरोप नुकताच करण्यात आला होता. तसेच बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या शिष्टमंडळाने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन आर्थिक मदतीसाठी साकडे घातले.
या पार्श्वभूमीवर आता विखेे गटाकडून पण आपल्यावर 'श्रीगणेश'मध्ये अडचणी आणत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले गेले आहे. कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी याबाबत एक प्रसिद्धिपत्रकाद्वारे बाळासाहेब थोरातांच्या 'संगमनेर' आणि विवेक कोल्हे यांच्या 'संजीवनी' साखर कारखान्यांनी आर्थिक भांडवल गुंतवून चालवून दाखवावा, असे आव्हानच दिले आहे.
गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने जिल्हा बँकेच्या कर्जावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेले आरोप कपोकल्पित आणि व्यक्तिद्वेषी भावनेतून असून, विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात शक्ती वाया घालविण्यापेक्षा संगमनेर आणि संजीवनीने कारखाना चालवून दाखवावा. गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नका, असे आवाहन गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी केले आहे.
गणेश कारखाना निवडणुकीत दोन जबाबदार नेत्यांनी कारखाना यशस्वीपणे चालविण्याचा शब्द निवडणुकीत सभासदांना दिला आहे. आता त्यांनीच भांडवलाची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. डॉ. विखे पाटील सहकारी कारखान्याने कारखाना चालविण्यास घेताना स्वत:च्या हिंमतीवर भांडवलाची उभारणी करून सभासद, कामगारांचे हित जोपासले होते. कारखाना कर्जमुक्त केला. संगमनेर आणि संजीवनी कारखान्यांनीसुद्धा भांडवलाची उभारणी करून गणेश कारखाना चालवावा. मात्र, कारखान्याला कर्जबाजारी करू नये, असे दंडवते यांनी म्हटले आहे.
Edited by - Chetan Zadpe
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.