

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा वडाळा-नान्नज गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने ते आता बीबी दारफळ गटातून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत.
साठे यांनी सहविचार सभेत स्पष्ट केले की, राजकीय हेतूने त्यांचा गट आरक्षित केला गेला, परंतु ते दुसऱ्या गटातून निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
बीबी दारफळ गटात भाजपकडून इंद्रजीत पवार यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश मार्तंडे आणि माजी आमदार दिलीप माने गट यांच्या भूमिकेमुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Solapur, 25 October : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा वडाळा-नान्नज हा हक्काचा जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांच्या निवडणूक लढविण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता खुद्द बळीराम साठे यांनीच निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांच्या बालेकिल्ल्यातून साठे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची विचारविनिमयासाठी सहविचार सभा मोहोळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत बोलताना बळीराम साठे (Baliram sathe) यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याबाबत थेट भाष्य केले आहे.
आमचा वडाळा-नान्नज जिल्हा परिषद (Jillha Parishad) गट राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून आरक्षित करण्यात आला आहे. मात्र, मी दुसऱ्या गटातून निवडणूक लढवून निवडून येणार आहे, असे बळीराम साठे यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे साठे हे आता शेजारच्या बीबी दारफळ गटातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी बळीराम साठे यांनी समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे, सर्वांनी झोकून देऊन काम करावे,’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीत वडाळा-नान्नज गट ओबीसीसाठी आरक्षित झाला होता, त्यामुळे साठे यांच्या निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम होता.
साठे यांनी दुसऱ्या गटातून उभे राहून निवडून येणार असल्याचे सांगून त्यांनी शेजारच्या बीबी दारफळ गटातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीबी दारफळ गटातून बळीराम साठे यांनी यापूर्वी १९९७ मध्ये निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांची माजी आमदार दिलीप माने गटासोबत युती होती. त्या निवडणुकीत साठेंनी शिवाजी ननवरे यांचा पराभव करून विजय मिळविला होता.
बीबी दारफळ गटातून भाजपकडून इंद्रजीत पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, माने आणि या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश मार्तंडे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे, त्यामुळे बीबी दारफळ गटाकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.
या सहविचार सभेला मनोहर डोंगरे, दीपक गायकवाड, विजयराज डोंगरे, सीमा पाटील, संजय क्षीरसागर, मानाजी माने, सतीश जगताप, सचिन जाधव,बाळासाहेब गायकवाड, राजाभाऊ रसाळ, नागेश वनकळसे, सर्जेराव चवरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Q1. बळीराम साठे कोणत्या गटातून निवडणूक लढविणार आहेत?
A1. ते बीबी दारफळ गटातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
Q2. त्यांचा वडाळा-नान्नज गट का बदलला?
A2. वडाळा-नान्नज गट ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी दुसरा गट निवडला.
Q3. बीबी दारफळ गटातून कोणते इतर उमेदवार चर्चेत आहेत?
A3. भाजपकडून इंद्रजीत पवार चर्चेत आहेत.
Q4. सहविचार सभेला कोण उपस्थित होते?
A4. मनोहर डोंगरे, दीपक गायकवाड, सीमा पाटील, सतीश जगताप आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.