

सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या मतदानादरम्यान मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथे अनेक वेळा ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मशीन बदलावी लागली.
अकलूजमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने भाजप उमेदवार अंकिता पाटोळे यांच्या पतीने मशीन जमिनीवर आपटल्याची तक्रार देण्यात आली असून, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बिघाडांमुळे अनेक केंद्रांवर बटणे न दाबणे, युनिट फेल होणे यासारख्या समस्या आल्या; त्यामुळे सात ठिकाणी बॅलेट युनिट बदलण्यात आली आणि मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले.
Solapur, 02 December : सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीपैकी दहा नगरपरिषदांसाठी आज मतदान झाले. मतदानाच्या वेळी दिवसभर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे त्या मशीन बदलून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. मात्र अकलूजमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने भाजप उमेदवाराच्या पतीने ते मशीन जमिनीवर आपटले.
याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे, त्यामुळे अकलूजमध्ये (Akluj) एकच खळबळ उडाली आहे.
अकलूज नगर परिषदेची (Nagar Parishad) पहिलीच निवडणूक असून नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्सुकता दिसून आली. सकाळी थंडी असल्याने गर्दी थोडी कमी होती. मात्र, त्यानंतर मतदार वाढत गेले, त्यामुळे मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळी मतदानाला सुरुवात होताच काही वेळातच प्रभाग क्रमांक पाचमधील अकलाई विद्यालयातील बूथवरील मशिन काही काळासाठी बंद पडली होती. येथील बॅलेट युनिट बदलून दुसरे लावण्यात आले.
दरम्यान, दुपारच्या वेळी प्रभाग ७ ‘ब’मधील (स्वीमिंग टॅंक परिसर) भाजप उमेदवार अंकिता पाटोळे यांचे पती अंबादास पाटोळे (उमेदवाराचे प्रतिनिधी) यांनी मशिनचे बटण अडकते; म्हणून मशिनच जमिनीवर आपटल्याची तक्रार क्रांतिसिंह माने-पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यावर पोलिसांनी अंबादास पाटोळे यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्या होत्या. मात्र, मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, तर अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे. पण अनगरमधील अपिलावरील सुनावणीचा निकाल वेळेत न आल्याने अनगरमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरीत दहा नगरपरिषदांसाठी सुमारे ४९९ केंद्रावर आज सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मोहोळ आणि कुर्डुवाडीतील प्रत्येकी दोन केंद्रांवरील मशिनला कनेक्शनचा अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे तेथील मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. काही मतदान केंद्रांवरील मशिनची बटणे दबत नव्हती. त्यामुळे तेथील बॅलेट युनिट बदलण्यात आले.
जिल्ह्यातील अकलूज, अक्कलकोट, बार्शी आणि सांगोला येथील सात मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट बदलून दुसरे लावण्यात आले आहेत. काही मतदान यंत्रांची बटण दबली जात नव्हती. काही मशीनची बटणं आतमध्येच अडकून राहत होती. सांगोला येथील विद्या मंदिर प्रशाला, जिल्हा परिषद शाळा धनगर गल्ली, जिल्हा परिषद शाळा भोपळे रोड या मतदान केंद्रांवरील मशिनची बटणे दबली जात नव्हती, त्यामुळे सांगोल्यातील तीनही मशिन बदलण्यात आलेल्या आहेत.
मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथे वारंवार बिघाडाची नोंद झाली.
भाजप उमेदवारांच्या पतीने “बटण अडकते” असा आरोप करून मशीन जमिनीवर आपटल्याची तक्रार झाली.
संबंधित व्यक्ती अंबादास पाटोळे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट बदलून मतदान पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.