

Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ९ जागांसाठी गुरुवारी (ता. २६ नोव्हेंबर) झालेल्या मतांची मोजणी आज (ता. २७ नोव्हेंबर) झाली. या नऊ जागांपैकी आठ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या, तर मोहिते पाटील यांनी माळशिरस सोसायटी मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला राखला. त्यामुळे बिनविरोध झालेल्या १० आणि जिंकलेल्या ८ जागा यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भाजपची इतिहास पहिल्यांदाच सत्ता आली आहे.
सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. सुरुवातीला १० जागा बिनविरोध झाल्याने भाजपची सत्ता आल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. मात्र, उर्वरीत नऊ जागांवर काय निकाल लागतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जाहीरपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनेलला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. त्यांच्या जोडीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ताकद लावली होती.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील लोकांना सोबत घेऊन मोहिते पाटील यांनी सत्ताधारी भाजपच्या उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी पॅनेल उभे केले होते. भाजपसोबत जिल्ह्यातील मातब्बर मंडळी असतानाही मोहिते पाटील यांच्या पॅनेलनी दिलेली लढत लक्षवेधी ठरते.
दरम्यान, मोहिते पाटील गटाच्या दोन जागा थोड्या मतांनी पराभूत झाल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वालाही एक-दोन जागा जातील, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात मोहिते पाटील यांना केवळ एकच जागा जिंकता आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी मनीष देशमुख यांना दिलेली लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. अनेक वर्षांचा राजकीय वारसा असलेल्या देशमुख यांना शिंदेंनी विजयासाठी अक्षरशः झुंजवले. पण त्याला भाजपमधील अंतर्गत राजकारणाची किनार होती का, याचेही उत्तर येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे अमोल शिंदे यांच्या राजकीय कसब नाकारून चालणार नाही.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नऊ जागांवरील मतदारसंघनिहाय विजयी व पराभूत उमेदवार आणि त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे
माळशिरस सोसायटी
अर्जूनसिंह मोहिते पाटील (मोहिते पाटील पॅनेल) ....८३ मते.... विजयी
शहाजीराव देशमुख (भाजप) ............ ३३ मतं....पराभूत
ज्ञानराज पाटील (जानकर गट).........२४मतं ........पराभूत
..................
सांगोला सोसायटी
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (भाजप)........ ६० मतं....विजयी
संजय इंगोले (मोहिते पाटील पॅनेल).....१५ मतं.........पराभूत
..............
महिला मतदारसंघ
श्यामल बागल (भाजप)...............१३४८....विजयी
अर्चना घाडगे (भाजप)..................१३०७....विजयी
अस्मिता गायकवाड (मोहिते पाटील पॅनेल) ७५९...पराभूत
सिंधु पाटील (मोहिते पाटील पॅनेल).......७२१ .....पराभूत
................
अनुसूचित जाती-जमाती
महादेव कांबळे (भाजप).......१४३८ मते........विजयी
दत्तात्रेय खडतरे (मोहिते पाटील पॅनेल) ७९८ मते....पराभूत
विमुक्त जाती-भटक्य जमाती विशेष मागास प्रवर्ग
राजेंद्र बंदिछोडे (भाजप)..........१२९२ मते........विजयी
डॉ अनिकेत देशमुख (मोहिते पाटील पॅनेल)...९३२ मते पराभूत
.............
कृषी पणन
रणजित शिंदे (भाजप).............७९ मते....विजयी
संग्रामसिंह जहागिरदार (मोहिते पाटील पॅनेल) .....२९ मते....पराभूत
..........
दुग्ध व इतर शेती संस्था
सूर्यादित्य साळुंखे (भाजप)............१९४ मते.....विजयी
शिवाजी पाटील (मोहिते पाटील पॅनेल)...१०८ मते पराभूत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.