

Solapur, 30 June : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले होते. तत्पूर्वी राऊतांनी जिल्हा बॅंकेवर तीन सदस्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बॅंकेवर तिघांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या हालचाली भाजपकडून जोरदारपणे सुरू आहेत. त्यात खुद्द आमदार राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार राजन पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील गैरव्यहारप्रकरणी २०१८ मध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ बरखास्त करून राज्य सरकारने प्रशासकाची नेमणूक केली होती. दरम्यानच्या काळात बॅंकेतील गैरव्यहाराची आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधित संचालकांवर निश्चित करण्यात आली होती. बॅंकेवर २०१८ पासून प्रशासक आहे.
दरम्यानच्या काळात काहींनी कोर्टात धाव घेऊन निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नव्हते. आमदार राजेंद्र राऊत यांनी न्यायालयाच्या माध्यमातून बॅंकेतील गैरव्यवहाराबाबत लढा दिला आहे. तो अजूनही चालू आहे. बॅंकेच्या संचालक मंडळांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी होती. मात्र, दोषींवर अजूनही कारवाई झालेली नाही. यातील बहुतांश जण भाजपच्या आश्रयाला आलेले आहेत.
आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर तीन सदस्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याबाबत विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
विभागीय निबंधक कार्यालयाकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रशासकीय मंडळाबाबतचा अहवाल मागितला होता. तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नुकताच सादर केला आहे, त्यामुळे प्रशासकीय मंडळाच्या नेमणुकीबाबत हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळासाठी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार राजन पाटील या तिघांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय शिंदे यांनाही संधी मिळू शकते.
तेच नेते फक्त पक्ष बदलला...
सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघ (दूध पंढरी), सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाची बलस्थाने होते. या संस्थांवर अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता गाजवली. यातील बहुतांश नेत्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे, तर काहीजण भाजपसोबत गेलेले आहेत. आता त्याच नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकारी संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.