

Mumbai, 30 June : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा खासदार फोडल्यानंतर आज पुन्हा एकदा मोठा बॉम्ब टाकत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनाच गळाला लावले आहे. शिवसेनेत प्रवेश देऊन शिंदे यांनी अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचे गिफ्ट दिले आहे. मात्र, त्यामुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदार नीलम गोऱ्हे यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाल्याचे मानले जात आहे. कारण निरोपाच्या कार्यक्रमात आणि त्यानंतरही गोऱ्हेंनी थेट उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दिवसेंदिवस पडझड होत आहे. सुरुवातीला ‘ऑपरेश टायगर’ राबवून एकनाथ शिंदे यांनी सहा खासदारांना आपल्या पक्षात घेतले. त्यासंदर्भातील कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला.
साथ सोडलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न सुरू असतानाच मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वरळीत एकनाथ शिंदे यांनी आज ‘राजकीय बॉम्ब’ फोडला आहे. ज्युनिअर ठाकरेंच्या किचन कॅबिनेटमधील सदस्य असलेले सचिन अहीर यांनाच एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहे.
सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील एन्ट्रीमुळे ज्येष्ठ आमदार नीलम गोऱ्हे यांच्या इच्छा-आकांक्षाला सुरुंग लागला आहे. आमदार गोऱ्हे या अखंड शिवसेनेपासून उपसभापती या पदावर होत्या. २४ जून २०१९ पासून एप्रिल २०२६ पर्यंत त्या विधान परिषदेच्या उपसभापती होत्या.
विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळावी आणि उपसभापतिपद मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. पक्षातील ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांची इच्छाही रास्त होती. मात्र, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडीला दोषी ठरवून उपसभापती असताना नीलम गोऱ्हे यांनी तत्काली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तो निर्णय पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठीच गोऱ्हेंनी घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र त्यावरून मोठा गदारोळ उठला होता.
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, असे सांगून दोशी यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले होते. त्यानंतर काही दिवसांनी दोशी यांच्या बदली करण्यात आली. मात्र, गोऱ्हेंचा तो निर्णय भाजपला रुचला नव्हता.
विधान परिषदेच्या निवृत्त सभासदांना निरोप देण्याच्या कार्यक्रमातही नीलम गोऱ्हे यांनी थेट उद्वव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला होता. यापूर्वी त्यांनी ठाकरेंबाबत कधीच अशी भाषा वापरली नव्हती. त्या भाषणामुळे अनेकजण आवक् झाले होते. मात्र, विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळावी आणि उपसभापतिपद आपल्या हातून निसटू नये, अशी त्यांची तजबीज होती. मात्र, सचिन अहिरांच्या शिवसेना एन्ट्रीमुळे गोऱ्हे यांचे स्वप्न बिघडविल्याची चर्चा आहे.
नाराजीचा प्रश्नच नाही : नीलम गोऱ्हे
मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार प्रत्येक गोष्टी होत असतात. त्यानुसार सचिन अहिर यांना उपसभापतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. मी 17 वर्षे आमदार आणि शिवसेना नेता म्हणून मी काम केले आहे. गृहनिर्माण मंत्री, गिरणी कामगारांचे प्रश्नासाठी केलेले काम पाहता अहीर यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षात नाराजीचा प्रश्नच नाही. मला शिवसेनेत नेता केले आहे, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.