
Solapur, 21 February : भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी सहकार मंत्री असताना मंत्रिपदाचा गैरवापर आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारींच्या अनुषंगाने येत्या ९ एप्रिल रोजी आमदार देशमुख यांची लोकायुक्तांपुढे सुनावणी होणार आहे, त्यासाठी तक्रारालाही कागदपत्रांसह सुनावणीला उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
रविराज कदम (रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांनी सुभाष देशमुखांच्या (Subhash Deshmukh) विरोधात तक्रार दिली आहे. ते म्हणाले, आमदार सुभाष देशमुख यांनी २०१६ ते २०१९ दरम्यान सहकार मंत्री असताना मंत्रिपदाचा गैरवापर आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्या प्रकरणी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली हेाती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने लोकायुक्तांनी महसूल आणि वन विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये लोकायुक्तांनी (Lokayukta) सरकारच्या सात विभागांकडून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवालही लोकायुक्तांकडे आलेला आहे. त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारींमध्ये आणि चौकशी अहवालात काही तरी तथ्य दिसून आल्यानेच लोकायुक्तांनी येत्या ९ एप्रिल रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवली आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, महाराष्ट्रात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्याची माहिती सुभाष देशमुख यांनी मंत्री असताना आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख आणि राज्य सहकारी बॅंकेचे तत्कालीन संचालक अविनाथ महागांवकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्यांकडून कमी किमतीत जमिनी खरेदी केल्या. या जमिनीची सर्व खरेदी ही २०१६ ते २०१७ मध्ये झालेल्या आहेत. त्यानंतर २०१७ ते २०१८ मध्ये त्या जमिनी महामार्गामध्ये गेल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्गाकडून जमिनीचा मोबादला म्हणून १ कोटी ९२ लाख, १ कोटी ९५ लाख असा मिळाला आहे. नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर त्यांनी उरलेल्या जमिनी विकून टाकल्या आहेत. त्यांना शेती नको होती, त्यात जमिनीतून मिळणारी नुकसान भरपाई हवी होती. त्याच पद्धतीने त्यांनी दूध भुकटी प्रकल्पाला सरकारकडून अनुदान मिळवून दिले. तो ऑफीस ऑफ प्रॉफिटचा भाग होता. तसेच, गारमेंटच्या प्रकल्पासही ५८ लाखांचे अनुदान मिळवून दिले होते. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा दावा तक्रारदाराने केला आहे.
कदम म्हणाले, लोकमंगल या नावाने तब्बल ८३ कंपन्यांची यादी माझ्याकडे आहे, यातील बऱ्याचशा कंपन्या या कागदावर आहेत आणि कंपन्या कागदावर का असतात, हे सर्वांना सर्वश्रूत आहे, त्याचीही चौकशी करण्याची विनंती आम्ही लोकायुक्तांना केली आहे.
सोलापुरातील कुमठे गावातील मस्जिद वहिवाटदार देवस्थान इनामची ३२ एकर जमीन आहे. ती जमीन खरेदी करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांना पाहिजे त्या पद्धतीने तयार केली जात आहेत. त्यांनी २०१८ मध्ये संबंधित शेतकऱ्यासोबत पॉवर ऑफ ॲटर्नी आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं आहे. त्यसंदर्भात मी वक्फ बोर्ड आणि महसूल विभागाकडे रितसर तक्रार केलेली आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मंत्री असताना सुभाष देशमुख यांनी ज्या पद्धतीने पदाचा गैरवापर केला आहे. त्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. मी गेली सहा वर्षांपासून हा लढा देत आहे. मी जिथे जिथे अर्ज करतो, त्या ठिकाणी माझी हेटाळणी केली जाते. तसेच, राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.
माझ्या जिवितास धोका
माझा लढा चालूच राहणार आहे. मला भीती फक्त एका गोष्टीची वाटते की, मी गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माझा काही अनोळखी व्यक्तींकडून सतत पाठलाग केला जात होता. मी १५ डिसेंबर २०२३ मध्ये सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना भेटून माझ्या जिवितास धोका असल्याचा अर्ज केला आहे. मात्र, त्यावर पुढे काय झाले, याबाबत अजूनही मला माहिती दिली जात नाही, असा आरोपही कदम यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.