

माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपले मत मांडले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, त्यांच्या विरोधातील भावना आणि संघटनेची एकता अबाधित ठेवली जाईल आणि कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे माने यांचा पक्षप्रवेश सध्या लांबणीवर टाकण्यात आला आहे, तर पालकमंत्री जयकुमार गोरे मात्र त्यांच्या प्रवेशावर ठाम आहेत, यामुळे सोलापूर भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Solapur, 28 October : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ‘दक्षिण’मधील या कार्यकर्त्यांनी आज (ता. २९ ऑक्टोबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीची वेळ आम्ही घेतली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही आमचे म्हणणे त्यांच्या कानावर घालणार असल्याचे भाजपचे दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके यांनी चव्हाण यांच्या भेटीनंतर ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे डावलून माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांना पक्षप्रवेश देणार का, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या शिष्टमंडळात हनुमंत कुलकर्णी, संगाप्पा केरके, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे, महेश देवकर, अर्जुन जाधव, अतुल गायकवाड, प्रशांत कडते, यतीन शहा आणि सचिन पाटील आदी पदाधिकारी सहभागी आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह आणि विक्रमसिंह शिंदे, तसेच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर भेटीनंतर त्यांचा भाजप प्रवेश ठरला होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला होता.
माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला हेाता. मानेंच्या भाजप प्रवेशाच्या विरोधात दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी सोलापूर शहर भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. कार्यकर्त्यांनी मानेंच्या प्रवेशाला विरोध केल्याने सोलापूर भाजपमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यात दिलीप माने वगळता इतर तिघांचा म्हणजे राजन पाटील, यशवंत माने आणि बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा उद्या मुंबईत प्रवेश होणार आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे माने यांचा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे मात्र मानेंच्या भाजप प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे सोलापूर भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करणारे दक्षिण सोलापूरमधील कार्यकर्ते हे सोमवारी रात्री मुंबईला गेले होते. त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आता निर्णय काय होतो, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या भेटीसंदर्भात भाजपचे दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके म्हणाले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आम्ही भेटलो असून आमच्या भावना त्यांच्या कानावर घेतल्या आहेत. तसेच 2014 पासून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मजबूत होत गेलेल्या भाजप संघटनेबाबतची माहिती दिली. पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत हद्दवाढ भागात मिळालेले यश याची माहिती दिली. विद्यमान संघटनेच्या जोरावर आपण आगामी निवडणुका जिंकू शकतो, असा विश्वासही त्यांना दिला आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्यावर विविध प्रकारचे आरोप आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण संघटना विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माने यांना भाजपत प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणीचे निवेदन आम्ही प्रदेशाध्यक्षांना दिले आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द दिला आहे, असेही संगप्पा केरके यांनी सांगितले.
1. दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध का झाला?
स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे की त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेत विसंवाद आणि अस्थिरता निर्माण होईल.
2. कार्यकर्त्यांनी कोणाची भेट घेतली?
कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.
3. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काय आश्वासन दिले?
त्यांनी कार्यकर्त्यांना खात्री दिली की, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
4. दिलीप माने यांचा भाजप प्रवेश सध्या कोणत्या स्थितीत आहे?
कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे त्यांचा प्रवेश तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.