
Konkan politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंब सध्या सत्तेच्या केंद्रस्थानी असून एका घरातच एक खासदार आणि दोन आमदार आहेत. त्यामुळे राणे कुटुंबींयाच्या भोवतीने जिल्ह्याचे राजकारण फिरत आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांची नियुक्ती झाल्याने आणखी वजन वाढले आहे. यातच आमदार नीलेश राणे यांनी शिवसेनेत काही प्रवेश घडवून आणत आपण शिवसेना मोठी करणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत चढाओढ दिसून येत असतानाच या शीतयुद्धात रवींद्र चव्हाण यांची एंन्ट्री झाली आहे. त्यांनी कणकवली, बांदा येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपला राणे-चव्हाण यांच्यामुळे ग्रीप मिळल्याचे दिसत असून आमदार नीलेश राणे शिवसेनेसाठी एकाकी कशी झुंझ देतात हे पाहावं लागणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून नीलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आपण मुळातच शिवसैनिक असून सेनेसाठी काम करणार असल्याच जाहीर केले होते. यानंतर त्यांनी आमदारकी खेचून आणत आपला विजय साजरा केला होता. तर भाऊ नितेश राणे यांनी भाजपच्या तिकीटावर विजयी झाले होते. ते आता राज्याच्या मंत्रिमंडळात मत्स्य आणि बंदर मंत्री असून जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
त्यातच मूळ सिंधुदुर्गचे असणारे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात भाजपच्या वाढीकडे लक्ष घातले आहे. भाजपचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष असणारे चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी संघटना बांधणीवरून कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्यावरून आता जिल्ह्यासह राज्यात चर्चा सुरू झाली आहे. तर संघटना बांधणीवरून शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आमदार नीलेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये राजकीय भूकंप आणत भाजपच्या काही सरपंचांसह इतर पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला होता. यानंतरच आता शीतयुद्धाची सुरूवात झाली. नीलेश राणे यांनी कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का देत 18 सरपंच, 12 शक्ती केंद्रप्रमुखांसह सावंतवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांचा प्रवेश घडवून आणला. त्यांनी यासाठी मेळावा घेतला.
या राजकीय धक्क्याच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याचा दौरावरत आगामी निवडणुका कमळाशिवाय होऊ देणार नाही, असा निर्धार केला आहे. तर जिल्ह्यात यापुढे शतप्रतिशत भाजप हवी, असे सूचक वक्तव्य करताना थेट राणेंनाच इशारा दिला आहे.
यावेळी चव्हाण यांनी, पुढील राजकीय दिशा ठरवताना, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कमळाशिवाय होऊच देऊ नका असे म्हटले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप कशी उभी राहील याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जसे याआधी आपल्याला बळ दिले त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने पाठीशी उभे रहावे असे म्हटले आहे. तर कोकणात लोकसभा, विधानसभेत जसे यश मिळाले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ कमळच जिंकेल याची खातरजमा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तर भाजप एक विचारधारा असून कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने काही फरक पडत नाही. पक्ष तिथेच आहे. फक्त पदावरील माणसे फक्त बदलतात. यामुळे कोणी दादा किंवा भाई आगेबढो अशा घोषणा न देता पक्षाला वाढवा. भाजप आगे बढो, अशा घोषणा द्या असे म्हटले आहे.
महायुती सरकारमध्ये सत्तेत सहभागी असताना अशा प्रकारे जिल्ह्यात फोडीफोडीच्या राजकारणानंतर भाजप आक्रमक झाली आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त कमळच अशा सूचना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याने आता राणे कोणती भूमीका घेतात ते पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.