
Nagpur News: भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांचे बंधू आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे."जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो", अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महायुती (Mahayuti) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी नागपुरातील राजभवन येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
तर नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच आमदार निलेश राणेंनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. तुम्ही राणे कुटुंब संपवण्यासाठी प्रयत्न केला, पण आज तीन राणे तीन वेगवेगळ्या सभागृहात पोहचले असल्याची आठवण त्यांनी ठाकरेंना करून दिली आहे.
निलेश राणेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "श्री. उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो.
पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा? असा सवाल करत त्यांनी ठाकरेंना डिवचलं.
शिवाय आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हालाही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमचं अजून कठीण होईल. जय महाराष्ट्र!, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे ठाकरेंना इशाराच दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.