

Solapur, 20 April : सोलापुरात लिंगायत समाजाची स्मशानभूमी आणि करवाढीच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. करवाढीच्या मुद्यावरून आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी आयुक्तांना धारेवर धरल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. आमदारांनी प्रस्ताव समजून घेण्याची आवश्यकता होती, असे सांगतानाच काही शक्ती चांगल्या कामावर जाणीवपूर्वक पाणी टाकण्याचे काम करत आहेत, अशा निशाणाही साधला. पण त्या शक्ती कोण, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी पुरवठा योजना, करवाढ, लिंगायत स्मशानभूमीच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, आमदार कुठल्या पक्षाचे आहेत, हे महत्वाचे नाही. आमदारांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र, ती भूमिका मांडताना अगोदर महापालिकेचा तो प्रस्ताव वाचून आणि समजून घेण्याची आवश्यकता होती. कदाचित त्यांनी तो नंतर समजून घेतला असावा. मला माहिती नाही.
आपण आपलं मत मांडतो, तेव्हा तो प्रस्ताव काय आहे, त्यात काय सूचना आहेत, त्या अनुषंगाने काय वेगळं करणार आहोत. सोलापूर (Solapur) शहरातील नागरिकांच्या समोर जात असताना जबाबदारीने आपली भूमिका मांडली पाहिजे. त्यांनी प्रस्तावाची माहिती घेणं अपेक्षित होतं. तो प्रस्ताव इंग्रजीतून आहे, तो कोणाला समजला नाही, तर आयुक्त आणि महापौरांशी चर्चा करून तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडून माहिती घेणे हे तीनही आमदारांचे अधिकार आहेत, असा टोला गोरे यांनी दोन्ही देशमुखांना लगावला.
गोरे म्हणाले, शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तसेच, नसणारे विषय तयार करणाऱ्यांपासूनही आपण सावध राहिलं पाहिजे. परवा लिंगायत समाजाच्या स्माशनभूमीसाठी महापलिकेने दोन एकर जागा दिली. शहरातील समाजाच्या स्मशानभूमींची देखभाल सिद्धेश्वर देवस्थानकडे आहे.
प्रशासनाच्या काळात स्मशानभूमी संदर्भात काही ठराव घेतले गेले होते. सिद्धेश्वर देवस्थान हा आमचा सर्वांचा अभिमान आहे. तसेच, होटगी मठ महत्वपूर्ण आहे. त्यामुळे स्मशानभूमी कोणी चालवावी, हा दोन संस्थांमधील विषय आहे. त्या दोन संस्थांनी बसून त्यातून मार्ग काढावा. मार्ग निघाला नाही, तर महापालिकेस कुठलातरी निर्णय घ्यावा लागेल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, प्रत्येक मिटिंगच्या वेळी चांगल्या निर्णयावर पाणी टाकण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी तयार करायच्या. १२०० कोटींची पाणीयोजना आणि दोन एकर जागा यावर चर्चा होत नाही तर ते कोणी चालवावी, यावर वाद निर्माण करणे उचित नाही.
मी होटगी मठाधिपतींशी बोललो. ‘तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल,’ असे त्यांना सांगितले. तसेच, सिद्धेश्वर देवस्थानशीही बोललो, त्यांनी सांगितलं की, तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. या दोन्ही ठिकाणी वाद नसताना, वाद का निर्माण होतो, काही शक्ती जाणीवपूर्वक हे वाद निर्माण होईल, अशी व्यवस्था निर्माण करतात. काही व्यवस्था अशा आहेत की, जाणीवपूर्वक प्रत्येक निर्णयावर शंका उपस्थित करून विकासकामांवर चर्चा न करता अन्य गोष्टींवर चर्चा करून विकासकामावरचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप गोरे यांनी केला.
चुकलं तिथं जरुर आरसा दाखवा. पण, शहराच्या विकासाचं काम होत असताना वादग्रस्त विषयाला किती महत्व द्यावं, याचा विचार करून शहराच्या विकासाच्या भूमिकेसाबत राहिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. झापलेल्या माणसाला जागं करणं सोप असतं. पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागं करणं अवघड असतं. यावर मी आता अधिक काही बोलणार नाही, असे सांगून गोरेंनी विषय आटोपता घेतला.
महापालिका चालवणंही आवश्यक : गोरे
महापालिकेकडून कोणतीही करवाढ करण्यात येणार नाही. गेल्या ४० वर्षांत करप्रणालीत कोणताही बदल झालेला नाही. करात वाढ झालेली नसताना खर्चात मात्र मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे महापालिका चालवणंही आवश्यक आहे. पुढच्या ४० वर्षांचा विचार करून आपण ही पाणी योजना राबवत आहोत, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.