

Satara, 20 April : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सातारा शहरातील गांधी मैदानावर सायंकाळी सात वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला अवघे काही तास उरलेले असताना शिवसेनेत राजीनामास्त्राने खळबळ उडाली आहे. शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह बूथ प्रमुखांनी सामूहीक राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सातारा शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा (Satara) जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सातारा येथे करण्यात येणार आहे. तसेच, कोरेगावमध्ये अंगापूर येथील कार्यक्रमात शिंदे सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते साताऱ्यात रात्री होणाऱ्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दौऱ्यापूर्वीच सातारा शहरातील शिवसेनेत मोठे बंड उफाळले आहे. शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत शहरातील बूथप्रमुखांनीही सामूहीक राजीनामे दिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री साताऱ्यात येण्याच्या अगोदरच एक विकेट पडली आहे.
नीलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना? असा थेट सवाल मोरे यांनी केला आहे. विकास निधीच्या वाटपातील पक्षपात, जिल्हा नियोजन समितीतून ऐनवेळी नाव कट होणे आणि सातत्याने डावलण्यात येत आहे, असा आरोप मोरे यांनी केला आहे.
मोरे यांचा स्थानिक पातळीवरील असंतोष तीव्रपणे उघड झाला आहे. ही नाराजी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची नसून कट्टर शिंदे समर्थक मानले जाणाऱ्या नीलेश मोरे यांच्याकडून चव्हाट्यावर आली आहे. गोवा-गुवाहाटीच्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाशी निष्ठा राखत, शिवदूत, शासन आपल्या दारी, लाडकी बहीण यांसारख्या योजनांपासून आरोग्य शिबिरे, वैद्यकीय मदत, अपंगांना व्हीलचेअर वाटप, धर्मवीर चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण, अशी विविध कामे आपण प्रामाणिकपणे केली आहेत, असा दावा मोरे यांनी पत्रातून केला आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच दुय्यम वागणूक मिळत असेल, तर निष्ठा ठेवून काय उपयोग? असा जाहीर सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. आमची निष्ठा शिंदेसाहेबांशी अखेरच्या श्वासापर्यंत आहे, पण आता पदावर काम करण्याची इच्छा उरलेली नाही, असा निर्वाणीचा इशाराही मोरे यांनी दिला आहे.
नीलेश मोरे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय जिल्हा संपर्क कार्यालय म्हणून चालवले, स्वतःसह कुटुंबालाही पूर्णवेळ पक्षकार्यात झोकून दिले, तरीही वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कार्यकर्त्यांना जपण्याची ताकद नसेल, तर पक्षात राहण्यात अर्थ नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी पक्षनेतृत्वाला विचारला आहे.
दरम्यान, सातारा शहरातील अनेक बूथ प्रमुखांनीही राजीनामे दिल्याने हा असंतोष वैयक्तिक न राहता संघटनात्मक बंडात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच उघडकीस आलेला हा अंतर्गत संघर्ष शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.