

Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजन करण्यात येत असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज तळेगाव आणि चाकण औद्योगिक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्ते दुरूस्तीच्या कामांची पाहणी करण्यासोबतच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
चाकण-शिक्रापूर मार्गावरील खड्ड्यांमुळे औद्योगिक वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यात पारंपरिक डांबरीकरण टिकत नसल्याने आता जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६० आरएमसी विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. हे मिश्रण अवघ्या अर्धा ते पाऊण तासात सेट होत असल्याने दुरुस्ती केल्यानंतर कमी वेळात वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे.
सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल थेट बसविण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक असलेल्या रस्त्यांवरील दुरुस्ती अधिक टिकाऊ होण्याची अपेक्षा आहे.
दर शुक्रवारी नोडल समितीची बैठक
औद्योगिक क्षेत्रातील समस्या एका छताखाली सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार आहे. रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, स्ट्रीट लाईट यांसह विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर या समितीमार्फत समन्वयाने काम केले जाणार आहे.
५४ किलोमीटरच्या मार्गावर विशेष लक्ष
चाकणमध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी तळेगाव-शिक्रापूर ५४ किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीला गती दिली जाणार आहे. याशिवाय नाशिक फाटा-राजगुरुनगर मार्ग आणि औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. नवीन रस्ते तयार करताना केवळ वाहनांसाठी रस्ता न करता त्यामध्ये फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅकचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चाकणला मेट्रोचे जाळे विस्तारण्याची तयारी
कामगार आणि नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी चाकण परिसरात मेट्रोचे जाळे वाढविण्याच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत. निगडी-चाकण, चाकण-राजगुरुनगर आणि तळेगाव-शिक्रापूर या प्रस्तावित मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी क्लस्टरच्या माध्यमातून टाउनशिप उभारण्याबाबतही शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
उद्योजकांच्या दारात अधिकारी
उद्योजकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकारी आठवड्यातून एक दिवस औद्योगिक परिसरात प्रत्यक्ष उपलब्ध राहणार आहेत. उद्योजकांनी आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, लोडशेडिंगचे नियोजन, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.