Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सोलापुरात मांदियाळी दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उद्या (ता. १७ जानेवारी) सोलापुरात येत आहेत. पालकमंत्री पाटील यांचा तीन दिवसांतील हा दुसरा, तर बावनकुळे यांचा गेल्या पंधरा दिवसांतील हा दुसरा दौरा आहे. पाटील हे पुढील तीन दिवस सोलापूर मुक्कामी असणार आहेत. (Chandrashekhar Bawankule, Chandrakant Patil on Solapur tour tomorrow)
सोलापूर येथील कुंभारीच्या रे नगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांच्या संकल्पनेतून असंघटीत कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. पहिल्या टप्यात १५ हजार घरकुलांचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी पालकमंत्री पाटील हे उद्यापासून तीन दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चंद्रकांत पाटील हे रे नगरमधील हेलिपॅड, सभास्थळ व इतर कामांचा आढावा घेणार आहेत. मोदी हे सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी यावेत, यासाठी चंद्रकांतदादा आग्रही आहेत. तसेच, मोदी यांचा सोलापुरात रोड शो व्हावा, यासाठीही चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे. मोदी यांचा रोड शो कोणत्या मार्गावर होणार, हे निश्चित नसले तरी होटगी रोडवर त्यांचा रोड शो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मोदी यांचा दौरा संस्मरणीय व्हावा, यासाठी चंद्रकांत पाटील हे स्वतः जातीने नियोजनात लक्ष घालणार आहेत.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही सोलापुरात येत आहेत. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. त्याच अनुषंगाने ते भाजपच्या बूथ वॉरियर्सचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात बावनकुळे यांच्याबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हेही सोलापुरात येत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा मेळावा झाल्यानंतर फडवणीस हे अक्कलकोटला जाणार आहेत. अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजप नेत्यांची मांदियाळी असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.